चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया आज पूर्ण झाली. सकाळी ११ ते दुपारी ३ या निर्धारित वेळेत महापौर पदासाठी एकूण १०, तर उपमहापौर पदासाठी ६ नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली. यामुळे महापालिकेतील सत्तास्थापनेच्या राजकारणाला अधिकृत सुरुवात झाली असून, निवडणूक प्रक्रियेबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महापौर पदासाठी तिन्ही प्रमुख पक्ष मैदानात उतरले आहेत. महापौर पदासाठी दाखल झालेल्या १० नामनिर्देशनां मध्ये भारतीय जनता पार्टीकडून ५, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून ४, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून १ नामनिर्देशनाचा समावेश आहे. महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकडून मनस्वी संदीप गिऱ्हे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधून संगीता मंगल भोयर, संगीता गोपालकृष्ण अमृतकर, सुनंदा दिलीप धोबे, वैशाली अजय महाडूळे तर भारतीय जनता पार्टीतर्फे संगीता राजेंद्र खांडेकर (३ नामनिर्देशन), सारिका सचिन संदुरकर (२ नामनिर्देशन) एकाच उमेदवाराकडून एकापेक्षा अधिक नामनिर्देशन दाखल करण्यात आल्याने छाननीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
उपमहापौर पदासाठी एकूण ६ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली असून, त्यामध्ये भारतीय जनता पार्टी – २, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – २, भारतीय शेतकरी कामगार पक्ष – १,अपक्ष – १असा पक्षनिहाय तपशील आहे. उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये अपक्ष म्हणून प्रशांत आनंदराव दानव, भारतीय शेतकरी कामगार पक्षाकडून प्रदीप शंकर देशमुख,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून वसंत राजेश्वर देशमुख,राहुल गेंदलाल चौधरी तर भारतीय जनता पार्टी कडून संजय नारायण कंचर्लावार यांनी २ नामनिर्देशनदाखल केले आहे.
१० फेब्रुवारीला विशेष सभा, त्याच दिवशी निर्णय
महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता चंद्रपूर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेचे अध्यक्षस्थान मा. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. भूषविणार आहेत. या सभेमध्ये प्रथम नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून, त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. छाननीनंतर १५ मिनिटांच्या कालावधीत लेखी नोटीस देऊन उमेदवारी मागे घेण्याची संधी देण्यात येणार आहे. यानंतर अंतिम उमेदवारांची घोषणा करून हात वर करून मतदान प्रक्रिया राबवली जाणार असून, त्याच बैठकीत महापौर व उपमहापौर निवडीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.
कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने अपक्ष आणि छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येणार असून, १० फेब्रुवारीची विशेष सभा चंद्रपूरच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
चंद्रपूर महापौर निवडणुकीत रंगत वाढली
चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज काँग्रेस, भाजप आणि उबाठा शिवसेना या तिन्ही प्रमुख पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे अपक्ष नगरसेवक आणि शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार असून, सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी, महापौर निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या बहुमतापासून काँग्रेस अद्याप चार मतांनी दूर आहे. त्यामुळे अपक्ष आणि शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय काँग्रेसला सत्ता स्थापन करणे अवघड ठरत आहे.
शिवसेनेने पाठिंब्यासाठी महापौर पदाची मागणी करत काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांची गणिते बिघडवली आहेत. अशातच आज शिवसेनेने थेट महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या पत्नी मनस्वी गिऱ्हे यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला असून, शिवसेना सत्ता संघर्षात तडजोडीच्या भूमिकेत नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
काँग्रेस पक्षाकडून महापौर पदासाठी तब्बल चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व उमेदवार खासदार प्रतिभा धानोरकर गटाचे मानले जात आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरम्यान, वडेट्टीवार गटाकडून वसंत देशमुख यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून महापौर पदासाठी संगीता खांडेकर, तर उपमहापौर पदासाठी संजय कंचर्लावर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपनेही सत्तास्थापनेबाबत सकारात्मक दावा करत, आवश्यक संख्याबळ जमवण्याचे संकेत दिले आहेत.
तिन्ही पक्षांचा विजयाचा दावा, सत्ता कुणाची?
काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी आपल्या विजयाचा दावा केला असला तरी, सध्याच्या संख्याबळानुसार अपक्ष नगरसेवक आणि शिवसेना हेच महापौर निवडणुकीतील ‘किंगमेकर’ ठरण्याची शक्यता आहे. महापौर निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, यावरच चंद्रपूर महापालिकेतील सत्तेचे भवितव्य ठरणार असून, पुढील काही तास चंद्रपूरच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.