Chandrapur Municipal Corporation
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता समीकरणे अधिक गुंतागुंतीची होत असतानाच जनविकास सेना आणि एआयएमआयएम यांनी संयुक्तपणे ‘महानगर आघाडी, चंद्रपूर’ या नावाने नवीन गटाची नोंदणी केली आहे. आज (दि.२३) नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात या गटाची अधिकृत नोंदणी करण्यात आली. या गटाच्या गटनेतेपदी जनविकास सेनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीनंतर सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या हालचालींमध्ये आज महत्त्वाची घडामोड घडली आहे. जनविकास सेना आणि एआयएमआयएम या दोन पक्षांनी एकत्र येत ‘महानगर आघाडी, चंद्रपूर’ या नावाने स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या गटाची नोंदणी आज नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आली.
या नव्याने स्थापन झालेल्या गटात वडगाव प्रभागातून निवडणूक जिंकलेले जनविकास सेनेचे नगरसेवक पप्पू देशमुख, मनिषा बोबडे आणि प्रतिक्षा येरगुडे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर एकोरी प्रभागातून निवडून आलेले एआयएमआयएमचे नगरसेवक अझहरुद्दीन शेख हेही या गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे महानगर आघाडीचे संख्याबळ चार झाले आहे.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत जनविकास सेनेने काँग्रेस पक्षासोबत निवडणूकपूर्व युती करत तीन जागांवर विजय मिळवला होता, तर एआयएमआयएमने स्वतंत्रपणे एक जागा जिंकली होती. निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षांनी संयुक्त गट स्थापन केल्याने चंद्रपूर महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा बदल झाला आहे.
महानगर आघाडीचे संख्याबळ पाहता आगामी सत्ता स्थापनेत हा गट ‘किंगमेकर’ची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना गटनेते पप्पू देशमुख यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “चंद्रपूर शहर महानगरपालिकेत स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. काँग्रेस पक्षाने तशी ठोस हमी दिल्यास सत्ता स्थापन करण्यासाठी आम्ही त्यांना निश्चितपणे पाठिंबा देऊ,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, महानगर आघाडीच्या या भूमिकेमुळे काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला असून, सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेल्या चर्चांमध्ये या गटाचे महत्त्व वाढले आहे.