चंद्रपूर

Chandrapur Municipal Corporation Election Result 2026: गंभीर आरोपांच्या छायेतही भाजपचे सुभाष कासनगोट्टूवारांचा दणदणीत विजय

Maharashtra Municipal Corporation Election Result 2026: आरोपांचा निकालावर परिणाम झाला नाही, राजकीय वर्तुळात चर्चा

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनावट शिक्के वापरून बोगस पट्टे वाटप केल्याचे गंभीर आरोप समोर आले असतानाही भाजपचे माजी शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी प्रभाग क्रमांक 01 तुकूममधून विजय मिळवला आहे. निवडणुकीपूर्वी वातावरण तापवणारे आरोप मतदारांवर फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत, हे निकालातून स्पष्ट झाले आहे.

महानगरपालिका निवडणुकीदरम्यान बोगस पट्टे वाटपाच्या आरोपांमुळे चंद्रपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. बनावट महापालिका शिक्क्यांचा वापर करून मतदारांना स्थायी पट्टे दिल्याचा आरोप भाजपचे माजी शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करून महापालिकेने ते पोलिसांकडे सोपवले होते.

मतदानाच्या अगदी तोंडावर हे आरोप समोर आल्याने निवडणूक प्रचारात या विषयाची जोरदार चर्चा झाली. विरोधकांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडत मतदारांची फसवणूक झाल्याचा आरोप केला. मात्र, या सर्व आरोपांचा थेट परिणाम निवडणूक निकालावर झाला नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

प्रभाग क्रमांक 01 तुकूममधून सुभाष कासनगोट्टूवार यांची थेट लढत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार जगदीश गुलाब लोणकर यांच्याशी झाली. अटीतटीच्या लढतीत कासनगोट्टूवार यांनी लोणकर यांचा पराभव करत विजय मिळवला. गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवरही मतदारांनी त्यांच्यावर विश्वास कायम ठेवत कौल दिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, आरोप आणि चौकशी सुरू असली तरी स्थानिक पातळीवरील संपर्क, संघटनात्मक ताकद आणि मतदारांशी असलेले संबंध याचा फायदा कासनगोट्टूवार यांना झाला. दुसरीकडे, विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकले नाहीत, असेही मत व्यक्त होत आहे. मात्र, निवडणूक निकालाने एक बाब स्पष्ट केली आहे की, आरोपांच्या सावलीतही सुभाष कासनगोट्टूवार यांनी मतदारांचा कौल आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT