Chandrapur Congress news Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Congress Politics | गटनेता बदलासाठी काँग्रेस नगरसेवकांचे पर्यटन; धानोरकर-वडेट्टीवार संघर्ष पुन्हा पेटला

राजेश अडूर यांच्या नेतृत्वाविरोधात १६ नगरसेवकांची बैठक; संख्याबळ जुळवण्यासाठी दोन्ही गटांची मोर्चेबांधणी

पुढारी वृत्तसेवा

Pratibha Dhanorkar Vs Vijay Wadettiwar

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला पुन्हा एकदा वेग आला असून गटनेते राजेश अडूर यांच्या पदावरून हकालपट्टी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक नगरसेवकांनी गटनेते बदलासाठी पुढाकार घेतला असून १५ जून रोजी विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान, धानोरकर समर्थक १५ नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घडामोडींमुळे काँग्रेसमधील धानोरकर-वडेट्टीवार संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आल्याची चर्चा रंगली आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे २७ नगरसेवक विजयी होऊन पक्ष सर्वात मोठा गट म्हणून उदयास आला होता. त्यानंतर ६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीत राजेश मुरली अडूर यांची काँग्रेस गटनेते म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पक्षांतर्गत मतभेद तीव्र होत असून आता ते उघड संघर्षात परिवर्तित झाल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेसच्या १६ नगरसेवकांनी दिलेल्या नोटिशीनुसार १५ जून रोजी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विद्यमान गटनेते राजेश अडूर यांना पदावरून दूर करून नवीन गटनेत्याची निवड करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच गटाच्या कार्यपद्धतीत आणि संघटनात्मक रचनेत बदल करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे.

सूचनेत नमूद करण्यात आलेल्या कारणांनुसार, सर्वाधिक नगरसेवक असूनही काँग्रेसला महापौरपद मिळवून देता आले नाही. सत्ताधारी पक्षनेतेपदाच्या दाव्यातही पक्षाला यश आले नाही. स्थायी समिती व इतर समित्यांवरील नियुक्त्या पक्षाच्या घटनेनुसार झाल्या नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे नेतृत्व बदलण्याची गरज निर्माण झाल्याचे नोटिशीत म्हटले आहे.

दरम्यान, गटनेता बदलासाठी आवश्यक संख्याबळ निश्चित करण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा आहे. खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक १५ नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना झाल्याचे सांगितले जात असून त्यामध्ये आमदार विजय वडेट्टीवार समर्थक पाच नगरसेवकांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे धानोरकर गटाने गटनेता बदलासाठी आवश्यक बहुमत मिळविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या हालचालींची माहिती मिळताच आमदार विजय वडेट्टीवार समर्थक उर्वरित नगरसेवकही सावध झाले असून त्यांनीही देवदर्शनाच्या निमित्ताने एकत्रित मुक्कामाची रणनीती आखल्याचे समजते. त्यामुळे दोन्ही गटांकडून नगरसेवकांना एकत्र ठेवण्याचे प्रयत्न सुरू असून आगामी बैठकीपूर्वी राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसमधील धानोरकर-वडेट्टीवार संघर्ष हा नवीन नसून स्थायी समितीच्या नियुक्त्या, महापौर निवडणूक आणि पक्षातील विविध पदांवरील प्रतिनिधित्व या मुद्द्यांवरून दोन्ही गटांमध्ये मतभेद वाढत गेले. आता हा संघर्ष थेट गटनेतेपदाच्या बदलापर्यंत पोहोचल्याने पक्षातील अंतर्गत सत्तासंघर्ष उघडपणे समोर आला आहे.

१५ जून रोजी होणाऱ्या बैठकीत नेमका कोणता निर्णय होतो आणि राजेश अडूर यांचे गटनेतेपद टिकते की नव्या नेतृत्वाची निवड होते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. या घडामोडींमुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT