चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेत बहुमताअभावी सत्तास्थापनेचा तिढा असतानाच काँग्रेसने आपल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलविल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महापौरपदाच्या निवडीपूर्वीच काँग्रेसने हा टोकाचा निर्णय का घेतला, यावरून अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले असून, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस मित्र पक्षांसह 30 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी स्पष्ट बहुमत नसल्यामुळे सत्तास्थापनेसाठी संघर्ष तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलविण्याचा निर्णय घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे एकूण 30 नगरसेवक दोन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक 17 नगरसेवक राज्याबाहेर एका ठिकाणी, तर आमदार विजय वडेट्टीवार समर्थक 13 नगरसेवक राज्यातील एका मेट्रो शहरात हलविण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही गट वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्याने पक्षातील गटबाजी उघडपणे समोर आल्याचे चित्र आहे.
सत्तास्थापनेच्या उंबरठ्यावर असताना असा निर्णय सहसा विरोधकांकडून संभाव्य फोडाफोडीच्या भीतीने घेतला जातो. मात्र, काँग्रेस स्वतः सर्वाधिक जागा जिंकूनही नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवते, याचा अर्थ पक्षांतर्गत अस्थिरता असल्याचे बोलले जात आहे. “बाहेरील दबावापेक्षा अंतर्गत विसंवादच अधिक धोकादायक आहे का?” असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
भाजपने आधीच अपक्ष व काँग्रेसबाहेरील नगरसेवकांशी संवाद सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसने नगरसेवकांना एकत्र ठेवण्याऐवजी दोन गटांत विभागून हलवणे, हेच पक्षातील नेतृत्वावरचा अविश्वास दर्शवते का, यावरही चर्चा सुरू आहे.
दरम्यान, काँग्रेसमधील अंतर्गत वादावर तोडगा काढण्यासाठी नागपुरात पक्षश्रेष्ठींची बैठक झाली असली, तरी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. उलट, या बैठकीनंतर नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलविण्याचा निर्णय झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचे संकेत मिळत आहेत.
या संपूर्ण घडामोडींवर उद्या नागपुरात खासदार प्रतिभा धानोरकर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांवर पडदा पडतो की आणखी राजकीय धुरळा उडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे काँग्रेस सत्ता स्थापनेच्या उंबरठ्यावर उभी असताना, दुसरीकडे स्वतःच्या नगरसेवकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अज्ञातस्थळी हलवावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे “काँग्रेस निवडणूक जिंकते, पण सत्ता टिकवण्याच्या संघर्षात अडकते” अशीच स्थिती चंद्रपुरात पुन्हा एकदा दिसून येते आहे.