Illegal Tobacco Transport
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अवैध तंबाखू विक्री व वाहतुकीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. मूल पोलिसांनी गुरुवारी ( दि. ८) गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या सुनियोजित नाकाबंदीमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व हुक्का शिशाचा मोठा साठा पकडला. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली असून, अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
गुरुवारी ( दि. ८) मुल पोलीस ठाण्याच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गोंडपिपरी ते चांदापूर फाटा मार्गावरील दुर्गम क्षेत्र बेबाळ येथे नाकाबंदी केली. दरम्यान, गोंडपिपरीकडून सावलीकडे जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या टाटा पंच (एम.एच.३३–एसी–५२०९) या चारचाकी वाहनास थांबवून तपासणी केली असता, त्यात शासनाने प्रतिबंधित केलेली “होला हुक्का शिशा” व “ईगल सुगंधित तंबाखू” असा ४,१८,४९० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
या मालाची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तातडीने वाहनासह मुद्देमाल जप्त केला. तसेच, आरोपी सुरज रमेश हजारे (वय २६, रा. व्याहाळ, ता. सावली, साहील बाबुराव वेस्कले (वय २२, रा. व्याहाळ, ता. सावली), राहुल पुरुषोत्तम खोब्रागडे (वय ३२, रा. गडचिरोली) यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे मुल येथे गुन्हा नोंदवण्यात आला.
या कारवाईत प्रतिबंधित तंबाखूसह, वाहतुकीसाठी वापरलेले वाहन (अंदाजे किंमत ६,००,०००) असा मिळून एकूण १०,१८,४९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाईतील पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात सपोनि अमित आत्राम, पोउपनि उत्तम कुमरे, पोहवा राष्ट्रपाल कातकर, इंदल राठोड, भोजराज मुंडरे, सुनिल कुळमेथे, पोअं चिमाजी देवकते, धनराज देवारे, नरेश कोडापे, दिलीप आदे, शंकर बोरसरे, स्वप्नील खोब्रागडे, विशाल वाढई यांनी कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.