चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील मौजा मोहाळी येथे घडलेल्या एका थरारक खून प्रकरणाचा उलगडा सिंदेवाही पोलिसांनी केला आहे. मृतक राजु आनंदराव सिडाम (वय ३९) याचा खून त्याच गावातील दोन तरुणांनी अपमानाचा व रागाचा सूड घेत धारदार शस्त्राने केला असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना आठवडाभरानंतर अटक केली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १.३० वाजता, मोहाळी येथे ही घटना घडली. मृतक राजु सिडाम याच्याकडे त्याचे परिचित असलेले महेंद्र भोजराज पारश्री (वय २६) व मयुर रामदास वाघमारे (वय २८) दोघेही रा. मोहाळी हे दारू पिण्यासाठी गेले होते. दारूच्या नशेत झालेल्या वादातून मृतकाने आरोपी महेंद्र पारश्रीला व त्याच्या सासरच्यांना अश्लील व अपमानास्पद शब्द उच्चारले.
त्यामुळेतो चांगलाच संतापला. रागाच्या भरात त्याने सोबत आणलेल्या धारदार चाकूने राजु सिडामच्या गळ्यावर वार केला. गंभीर जखमी अवस्थेत तो जमिनीवर कोसळला. तेव्हा आरोपीने पुन्हा वार करून त्याला ठार मारले. त्यानंतर आरोपी महेंद्र व त्याचा सहकारी मयुर वाघमारे यांनी मृतदेहाला घरातील दुसऱ्या खोलीत ओढत नेऊन पोटावर सपासप वार करून निर्दयतेने खून केला. घटनेनंतर दोघेही आरोपी गावातून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच फिर्यादी पुनम गजु सिडाम (वय ३२) यांनी सिंदेवाही पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. यावरून गुन्हा क्रमांक ३५४/२०२५ भा.दं.सं. कलम ३०२ अंतर्गत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान मृतकाचे आप्तेष्ट, नातेवाईक आणि संशयित व्यक्तींची चौकशी करण्यात आली, मात्र ठोस पुरावे मिळाले नाहीत. अखेरीस गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांना आरोपींचा माग काढण्यात यश आले.
दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ९ वाजता सिंदेवाही पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी गावात गणेशोत्सव वर्गणी गोळा करताना मृतकानेही शिवीगाळ करून त्यांना अपमानित केले होते, त्यामुळे राग मनात होता. त्याच रागातून त्यांनी खून केला.
सिंदेवाही चे ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सतीश मेश्राम, पो.ह.वा. दर्शन लाटकर, सचिन डोंगरे, मधुकर आत्राम, पो.अं. संजय जुमनाके, आफताब सय्यद, दादाजी रामटेके, जफर शेख, सत्यवान सुरपाम आणि अजहर सय्यद यांनी योग्य दिशेने तपास करून आठवडाभरानंतर खून प्रकरणाचा उलगडा होऊन दोन आरोपाला अटक करण्यात पोलिसानं यश आले.