missing cases Pudhari
चंद्रपूर

चंद्रपुरात खळबळ! एकाचवेळी तीन अल्पवयीन मुले बेपत्ता

महाकाली वॉर्ड परिसरातील घटना; पोलिसांची शोधमोहीम सुरू, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : शहरातील महाकाली वॉर्ड परिसरातून एकाचवेळी तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ९, १३ आणि १५ वर्षे वयोगटातील ही मुले (दि.८) परिसरात खेळत असताना अचानक गायब झाली. रात्री उशिरापर्यंत मुले घरी न परतल्याने पालकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र कोणतीही माहिती न मिळाल्याने अखेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, महाकाली वॉर्ड परिसरातील ही तीनही मुले नेहमीप्रमाणे घराजवळ खेळण्यासाठी गेली होती. सायंकाळ उलटल्यानंतरही ती घरी न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरात शोधाशोध सुरू केली. रात्री उशिरापर्यंत मुलांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे पालकांची चिंता अधिक वाढली.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने बेपत्ता मुलांची नोंद घेत शोधमोहीम सुरू केली आहे. शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून बसस्थानक, रेल्वे स्थानक तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी चौकशी केली जात आहे. पोलिसांकडून परिसरातील नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, एकाचवेळी तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यामुळे महाकाली वॉर्ड परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनीही या घटनेबाबत चिंता व्यक्त केली असून मुलांचा लवकरात लवकर शोध लागावा अशी मागणी होत आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित मुलांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT