चंद्रपूर : अल्पवयीन पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांची कठोर कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला एक महिन्याचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. तसेच पीडितेला धमकी दिल्याप्रकरणी दोन वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली.
फिर्यादीच्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी २०२३ रोजी पीडितेच्या घराजवळ राहणाऱ्या आणि पीडितेकडून ‘मामा’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या आरोपीने तिच्यावर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. पीडितेच्या आईने याबाबत विचारणा केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीत लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. तपासादरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल तसेच परिस्थितीजन्य पुरावे संकलित करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी वेळेत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
या खटल्याची सुनावणी चंद्रपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात न्या. पी. एम. गुप्ता यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. आसीफ शेख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. सरकार पक्षाने सादर केलेले साक्षी-पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवले. त्यानंतर २७ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली आगलावे यांनी केला. पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके यांनी तपासावर देखरेख केली. न्यायालयीन पैरवी अधिकारी महिला पोलीस हवालदार किशोरी वामनराव गोंडे (ब.नं. २३७०) यांनी न्यायालयीन कामकाजात पैरवी केली.