चंद्रपूर : शहरालगच्या एमआयडीसी परिसरात आज सोमवारी दुपारच्या सुमारास लक्की पेट्रोलियम ऑईल कंपनीमध्ये भीषण आग लागली. दुपारची वेळ असल्याने आग चांगलीच भडकली. लगेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आठ वाहने घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. आग लागण्याचे कारण अद्याप समोर आले नाही.
चंद्रपूर शहरालगत एमआयडीसी असून यामध्ये विविध उद्योग कार्यरत आहेत. याच परिसरात लक्की पेट्रोलियम ऑईल कंपनी आहे. याच कंपनीला आज सोमवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना समोर आली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीचे लोळ व धूर आकाशात दूरवरून पसरले. तास, दीड तास आग भडकतच राहिली. त्यामुळे या परिसरात असलेल्या इतर उद्योगांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.
विशेष म्हणजे याच परिसरात बऱ्याच कंपन्या आहेत. त्यामुळे आग पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. लगेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची आठ वाहने घटनास्थळी दाखल झाली. लगेच अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु वृत्तलिहिपर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती. या आगीमध्ये लक्की पेट्रोलियम ऑईल कंपनीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. लागूनच मोबाईल कंपनीच्या टॉवर असून या टॉवरलाही नुकसान झान्याचे समजते. विशेष म्हणजे या परिसरात अनेक उद्योग आहेत त्यांनाही या आगीचा धोका निर्माण झाला आहे.