चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासंघर्षावर अखेर पडदा पडताना दिसत आहे. काँग्रेसने महापौरपदावर ठामपणे दावा मांडत शहरात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. आज (दि.२३ जानेवारी) सायंकाळपर्यंत काँग्रेसचा गटनेता आणि महापौर पदाचा उमेदवार जाहीर केला जाणार असल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचाच झेंडा फडकवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
चंद्रपूर महानगरपालिकेतील राजकीय अनिश्चिततेला अखेर पूर्णविराम मिळाल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसकडून देण्यात आले आहेत. महापौर पदावरून सुरू असलेला वाद आता संपला असून, सत्ता काँग्रेसकडेच राहणार असल्याचा विश्वास काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. “चंद्रपूरचा विषय आता संपला आहे. इथे आम्हाला काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे. आज गटनेता ठरणार असून महापौर पदाचाही उमेदवार निश्चित झाला आहे. सायंकाळपर्यंत अधिकृत घोषणा केली जाईल,” असे वडेट्टीवार म्हणाले.
सत्ता स्थापन करताना काँग्रेसने शिवसेनेला (उद्धव ठाकरे गट) सोबत घेण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेसोबत सकारात्मक चर्चा झाली असून, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे सत्तेतील योग्य भागीदारी शिवसेनेला दिली जाईल, असे आश्वासन वडेट्टीवार यांनी दिले. या निर्णयामुळे चंद्रपूर महापालिकेत स्थिर व मजबूत सत्तासमीकरण उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही काँग्रेसने राजकीय हालचालींना वेग दिला आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस मित्रपक्षांना सोबत घेण्याच्या तयारीत आहे. वंचित बहुजन आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह आघाडी होण्याची शक्यता असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. यासोबतच काही स्थानिक संघटना व पक्षांनाही आघाडीत सामावून घेण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चंद्रपूर महापालिकेतील सत्ता निश्चित झाल्याने आता सर्वांचे लक्ष महापौर आणि गटनेत्याच्या नावाकडे लागले असून, आज सायंकाळी होणारी अधिकृत घोषणा शहराच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरणार आहे.