चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता संघर्षावर अखेर काँग्रेस हायकमांडने तोडगा काढल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दिल्ली येथे काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर महापौर आणि उपमहापौर पदाबाबत निर्णय जवळपास निश्चित झाला असून, या संघर्षात खासदार प्रतिभा धानोरकर यांची सरशी झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर पदावरून सुरू असलेला काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अखेर मिटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर काँग्रेस हायकमांडने हस्तक्षेप करत तडजोडीचा मार्ग काढला आहे. दिल्ली येथे काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्यासोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीला आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर दोघेही उपस्थित होते. या बैठकीत चंद्रपूर महापालिकेतील सत्तास्थापन, पदवाटप आणि पुढील राजकीय समन्वयाबाबत सविस्तर चर्चा झाली.
सूत्रांच्या माहितीनुसार, चंद्रपूर महापालिकेचे महापौर पद खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे जाणार आहे. तर उपमहापौर पद विजय वडेट्टीवार यांच्या सांगण्यावरून देण्यात येईल, अशी तडजोड करण्यात आल्याचे समजते. या निर्णयामुळे वडेट्टीवार–धानोरकर संघर्षात प्रतिभा धानोरकर यांची सरशी झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. याशिवाय, स्थायी समिती अध्यक्षपद शिवसेनेला (ठाकरे गट) देण्यात येणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. महापालिकेतील सत्ता संतुलन राखण्यासाठी, जो गट काँग्रेससोबत येईल त्यांना स्थायी समिती अध्यक्षपद देण्याचा फॉर्म्युला ठरवण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.
महत्त्वाचे म्हणजे, महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेत्याची नियुक्ती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कमिटी ठरवेल, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे. यासोबतच, भविष्यात दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या मतदारसंघात राजकीय हस्तक्षेप किंवा ‘लुडबुड’ करू नये, असा स्पष्ट अलिखित करारही झाल्याचे सूत्रांकडून समजते. या हायकमांडच्या तोडग्यामुळे चंद्रपूर काँग्रेसमधील दीर्घकाळ चाललेली गटबाजी संपुष्टात येणार का, की स्थानिक पातळीवर नव्या राजकीय हालचालींना सुरुवात होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या निर्णयामुळे चंद्रपूर महापालिकेतील सत्ता स्थिर होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.