Chandrapur Mayor Election pudhari photo
चंद्रपूर

Chandrapur Mayor Election: चंद्रपूर महापौर, काँग्रेस गटनेतेपदाचा वाद शमला मात्र फोडाफोडीने निवडणुकीत नवा पेच

Anirudha Sankpal

Chandrapur Mayor Election: चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेसाठी काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि महायुतीची रणनीती यामुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. आज सकाळी पार पडलेल्या महत्त्वाच्या 'झूम मीटिंग'नंतर काँग्रेसमधील वादावर तूर्तास पडदा पडल्याचे संकेत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने दिले आहेत. या बैठकीला राज्याचे प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि खासदार धानोरकर उपस्थित होते.

सत्तेचे समीकरण आणि जबाबदारी काँग्रेसकडे सध्या २७ नगरसेवकांचे संख्याबळ असून मित्रपक्षाचे ३ सदस्य मिळून हा आकडा ३० वर पोहोचला आहे. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले अतिरिक्त ४ सदस्य जुळवण्याची सर्वस्वी जबाबदारी खासदार धानोरकर यांनी स्वीकारली आहे. नव्या सूत्रानुसार, महापौर काँग्रेसचाच असेल आणि त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला गटनेतेपद देण्यावर एकमत झाले आहे. त्याबदल्यात पाच वर्षे स्थायी समितीचे नियंत्रण दुसऱ्या गटाकडे राहील, तर मित्रपक्षांना उपमहापौरपद दिले जाणार आहे.

भाजपकडून 'एक कोटी'ची ऑफर? सत्ता स्थापनेच्या या शर्यतीत भारतीय जनता पक्षही सक्रिय झाला असून, त्यांनी अपक्ष आणि इतर नगरसेवकांशी संपर्क सुरू केला आहे. "भाजपकडे सत्ता आणि पैसा आहे. माझ्या माहितीनुसार, काही नगरसेवकांना एक कोटी रुपये आणि पद देण्याची ऑफर देण्यात आली आहे. या प्रलोभनाला किती जण बळी पडतात, हे येणारा काळच सांगेल," असा खळबळजनक दावा काँग्रेस नेत्याने केला आहे.

वंचित आणि अपक्षांची भूमिका कळीची दुसरीकडे, उद्धव ठाकरे गट (UBT) आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येत ८ सदस्यांचा स्वतंत्र गट स्थापन केला आहे. यात काँग्रेसने तिकीट नाकारलेल्या दोन ज्येष्ठ अपक्ष नगरसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. "महापौर कोण होणार, यावरच आम्ही आमचा पाठिंबा ठरवू," अशी भूमिका या गटाने घेतल्याने पेच वाढला आहे.

भाजपची 'वॉशिंग मशीन' आणि छगन भुजबळ छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यात मिळालेल्या क्लीन चिटवर बोलताना या नेत्याने भाजपवर जोरदार टीका केली. "जे भाजपसोबत जातात, त्यांना भविष्यात क्लीन चिटच मिळते. भाजपची ही अशी 'पॉवरफुल वॉशिंग मशीन' आहे, जिथे गेलेले सर्वजण स्वच्छ होऊन बाहेर पडतात," असा टोला त्यांनी लगावला. अडीच वर्षे तुरुंगात घालवलेल्या भुजबळांच्या नुकसानीची जबाबदारी आता कोण घेणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT