चंद्रपूर : मोहफुल वेचायला जंगलात गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव बिटात उघडकीस आली आहे. मनोहर सखाराम चौधरी रा. आवळगाव असे मृत इसमाचे नाव आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगांव बिटात कक्ष क्र.११३८ मध्ये आज शुक्रवारी मनोहर सखाराम चौधरी हा वृद्ध सकाळी मोहाची फुले वेचण्याकरीता जंगलात गेला होता. मोहफुल वेचत असताना लगतच दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
दरवर्षी उन्हाळ्यात जंगलालगतच्या गावातील नागरिक मोह फुल वेचण्यासाठी जंगलात जातात. त्यापासून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नाने संसाराचा उदरनिर्वाह करतात. आज सकाळी मनोहर सखाराम चौधरी जंगलात गेला होता. मात्र वाघाने हल्ला करून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे तो कुटुंबातील कर्ता होता. त्यामुळे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्याच्या पश्चात पत्नी व मुलगा-मुलगी असा परिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आर.डी.शेन्डे व मेंडकी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून ताब्यात घेतला. त्यानंतर शव उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. वनविभागाने मृतकाच्या कुटुंबीयाना तातडीची म्हणून पन्नास हजाराची आर्थिक मदत केली आहे. आजच्या घटनेमुळे आवळगाव परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या परिसरात वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी गस्त वाढविण्याची मागणी शेतमजुरांनी केली आहे.