चंद्रपूर: महानगरपालिका निवडणुकीदरम्यान शहरातील प्रभाग क्रमांक १२ महाकाली प्रभागात मतदान सुरू असतानाच ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची घटना समोर आली असून, त्यामुळे मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे.
चंद्रपूर शहरातील प्रभाग क्रमांक १२ महाकाली प्रभागात असलेल्या सन्मित्र कॉन्व्हेंट येथील मतदान केंद्रावर आज मतदान सुरू असतानाच एका ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला. बूथ क्रमांक १० येथील खोली क्रमांक तीनमधील ईव्हीएम अचानक बंद पडल्याने तब्बल अर्ध्या तासापासून मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती.
ईव्हीएम बंद पडल्यामुळे मतदारांना मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागली. या तांत्रिक बिघाडामुळे मतदानाचा मौल्यवान वेळ वाया गेल्याचा आरोप करत काँग्रेसच्या उमेदवार आणि माजी महापौर संगीता अमृतकर यांनी संबंधित मतदान केंद्रावर मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच निवडणूक यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन ईव्हीएम दुरुस्ती व पर्यायी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकारामुळे मतदान प्रक्रियेवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.