Chandrapur Lightning Death Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Lightning Strike | विजेचा तडाखा अन् वादळी पावसाचा कहर; वीज कोसळून युवकाचा मृत्यू

खांबाडा येथे शेतात काम करताना वीज कोसळली; वरोरा शहरात झाडे कोसळून मालमत्तेचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Lightning Death

चंद्रपूर : वरोरा तालुक्यात मंगळवारी (दि.२३) सायंकाळी झालेल्या वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खांबाडा येथे शेतात काम करीत असताना वीज कोसळून धीरज वाल्मिक जोगे (वय 19) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांतही नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, धीरज जोगे हा आपल्या आई व काकांसोबत शेतात काम करीत होता. सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन वादळी पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या पावसादरम्यान धीरज याच्यावर अचानक वीज कोसळली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर धीरजला तातडीने उपचारासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे जोगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, वरोरा शहरातही वादळी वाऱ्याचा मोठा प्रभाव जाणवला. कोलरी आणि शिवाजी वॉर्ड परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. करपणेश्वर हनुमान मंदिराजवळील अनेक वर्षे जुने पिंपळाचे झाड कोसळल्याने एका घराचे मोठे नुकसान झाले. तसेच झाडांच्या फांद्या शेजारील घरांवर पडल्याने काही मालमत्तेचीही हानी झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच नगर परिषद, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली. तसेच रस्त्यांवर पडलेली झाडे हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे कामही हाती घेण्यात आले.

अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून मृत युवकाच्या कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT