चंद्रपूर

चंद्रपूर: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

अविनाश सुतार

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा: रस्ता ओलांडून जाणाऱ्या बिबट्याला एका अज्ञात वाहनाची धडक बसली. त्यात तो जागीच ठार झाला. ही घटना गुरूवारी रात्री अकराच्या दरम्यान मूल पासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या आकापूर गावाजवळील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ घडली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 हा गडचिरोली ते चंद्रपूर असा गेला आहे. या परिसरात बिबट्याचा मोठा संचार आहे. भक्ष्याच्या शोधात बिबट होता. यात तो रस्ता ओलांडून पुढे जात असताना एका अज्ञात वाहनाची धडक बसली. जबर धडकेने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत बिबट हा नर जातीचा होता. त्याचे वय अंदाजे दोन ते अडीच वर्षांचे होते. मृत बिबट्यावर प्राणी उपचार केंद्र चंद्रपूर येथे शवविच्छेदन करून दहन करण्यात आले. यावेळी सावली वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी विरूटकर, क्षेत्र सहाय्यक कोडापे, वनरक्षक बोनलवार उपस्थित होते.

याआधी सप्टेंबर महिन्यात राजोली मार्गावरील मरेगावजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार झालेला होता. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन तसेच इतर वन व्याप्त क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने या परिसरात वाघ, बिबट आणि इतर वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात संचार आहे. त्यामुळे भक्ष्याच्या आणि पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडून जाणा-या वन्यजीवांची संख्या अधिक आहे. त्यात वाहनाच्या धडकेने वन्यजीव, प्राणी ठार होत असल्याने वन्यप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT