अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई Pudhari
चंद्रपूर

Liquor Seized Chandrapur | अवैध विदेशी दारू वाहतुकीवर LCB ची धाड; ५.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त

बल्लारपूर हद्दीत नाकाबंदी करत कारवाई; दोन आरोपी ताब्यात, कारसह दारूचा साठा जप्त

पुढारी वृत्तसेवा

Foreign Liquor Seized

चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) चंद्रपूर पथकाने अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत ५ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ७ सप्टेंबर २०२६ रोजी बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी केली. यावेळी संशयास्पदरीत्या येणारी रेनॉल्ट डस्टर कार (MH 40 AC 9855) अडवून तपासणी करण्यात आली. कारमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा आढळून आला.

पोलिसांनी कारसह १०० नग ९० मिलीच्या सह्याद्री व्हिस्कीच्या बाटल्या, ४८ नग १८० मिलीच्या रॉयल स्टॅग विदेशी दारूच्या बाटल्या आणि २०० नग ९० मिलीच्या रॉयल स्टॅगच्या बाटल्या असा दारूचा साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या कारची किंमत सुमारे ५ लाख रुपये, तर दारूची एकूण किंमत ५२ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या कारवाईत नागेश पोचणा पाकूळवार (वय ३८, रा. भेंडवी, ता. राजुरा, जि. चंद्रपूर) आणि मुरली वेंकटाद्री पचवा (वय २९, रा. भेंडवी, ता. राजुरा) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात अप. क्र. ९१८/२०२६, कलम ६५(अ), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई उपविभाग राजुरा पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT