चंद्रपूर : चंद्रपूर शहर बुधवारी (दि.३०) सायंकाळी एका थरारक हत्याकांडाने हादरले. जमिनीच्या वादातून एका भावानेच आपल्या सख्ख्या भावावर देशी कट्ट्यातून गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या केली. जुनोना चौकातील विक्तूबाबा मठ परिसरात घडलेल्या या घटनेत बुद्धा टाक (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. मुख्य आरोपी, मृतकाचा भाऊ सोनू टाक, घटनेनंतर फरार झाला असून, पोलिसांनी या प्रकरणी एका साथीदाराला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास टाक कुटुंबीयांच्या राहत्या घरातच हा रक्तरंजित थरार घडला. वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपावरून सुरू असलेला वाद विकोपाला गेला. याच वादातून आरोपी सोनू टाकने आपला मोठा भाऊ बुद्धा याच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात प्रचंड घबराट पसरली. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
प्राथमिक तपासात या हत्येमागे वडिलोपार्जित जमिनीचा वाद असल्याचे समोर आले आहे. दोघा भावांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीच्या वाटपावरून तीव्र मतभेद होते, ज्याचे पर्यवसान अखेर हत्येत झाले. मृतक बुद्धा टाक आणि आरोपी सोनू टाक या दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. हाणामारी, परिसरात दहशत निर्माण करणे आणि आर्थिक फसवणुकीच्या अनेक गंभीर गुन्ह्यांची त्यांच्यावर नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हत्याकांडामुळे त्यांच्या गुन्हेगारी कारवाया पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक आणि श्वान पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरू आहे. मुख्य आरोपी सोनू टाक याच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. शहरात नाकाबंदी करण्यात आली असून, फरार सोनू टाकचा कसून शोध घेतला जात आहे. या दिवसाढवळ्या झालेल्या हत्याकांडामुळे जुनोना परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.