Illegal Gambling Raid Korpana
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात अवैध कोंबडा झुंजीच्या माध्यमातून जुगार खेळणाऱ्या तीन जणांवर कोरपना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या या छाप्यात ७ दुचाकींसह एकूण ३,९०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दिनांक २८ डिसेंबर, २०२५ रोजी पोलीस स्टेशन कोरपना हद्दीतील मौजा शिवापूर येथील शेतशिवार परिसरात काही इसम कोंबड्यांच्या पायाला कात्या (ब्लेडसारखी धारदार हत्यारे) बांधून त्यांची झुंज लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खात्री होताच कोरपना पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला.
या छाप्यात जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या आरोपी नामे गजु आत्राम, दौलत पिंपळशेंडे आणि देवराव कोडापे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून नगदी रोख रक्कम, ०३ जिवंत कोंबडे, ०३ कात्या (धारदार ब्लेड), तसेच झुंजीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. शिवाय घटनास्थळावरून आणि काही पसार झालेल्या आरोपींच्या मालकीच्या ०७ मोटारसायकली देखील जप्त करण्यात आल्या.
जप्त करण्यात आलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ३,९०,००० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अवैध जुगार, प्राणी क्रौर्य आणि सार्वजनिक सुव्यवस्था भंग यासारख्या गंभीर बाबींअंतर्गत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. काही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर श्री. रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक श्रीमती लता वाडीवे यांनी केले.
छापा पथकात पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकन, पोहवा बळीराम, पोहवा नामदेव, पोअं विनोद, पोअं साटव, पोअं लक्ष्मण आणि पोअं दिपक (सर्व पोलीस स्टेशन कोरपना) यांचा समावेश होता.