चंद्रपूर : ताडाळी येथील केतन हुंडाई वर्कशॉपमध्ये काम करत असताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सहकाऱ्याला वाचविण्याच्या प्रयत्नात २९ वर्षीय तरुणालाही विजेचा धक्का बसल्याने तो जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना मंगळवारी (६ ऑक्टोबर) सकाळी घडली.
मृत तरुणाचे नाव सारंग उर्फ मोहन कोयताडे (वय २१, रा. मोरवा) असे आहे, तर जखमी तरुणाचे नाव शुभम उमाटे (वय २९) आहे. दोघेही केतन हुंडाई वर्कशॉपमध्ये डेंटिंग-पेंटिंगचे काम करीत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहन कोयताडे आणि शुभम उमाटे हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर आले होते. दरम्यान, वर्कशॉप परिसरात काहीतरी जळल्यासारखा अथवा वेगळा वास येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे दोघांनी टिनाच्या शेडवर चढून परिसराची पाहणी करण्यास सुरुवात केली.
यावेळी वर्कशॉपजवळील झाडाच्या संपर्कात जिवंत विद्युत तार आल्याने झाडामध्ये विद्युत प्रवाह उतरला असल्याचे सांगण्यात येते. पाहणी करत असताना मोहन यांचा चुकून या झाडाला स्पर्श झाला. त्यांना जोरदार विजेचा धक्का बसून ते खाली कोसळले. मोहन यांना विजेच्या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी शुभम उमाटे यांनी तातडीने धाव घेतली. मात्र, त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. दोघांना घटनास्थळावरून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मोहन कोयताडे यांचा मृत्यू झाला.
शुभम उमाटे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच गावकरी व नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. या दुर्घटनेमुळे मोरवा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.