Jankapur Mobile Tower Dispute
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील जनकापुर येथे नियमांना बगल देत उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरविरोधात स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी सात दिवसांत टॉवर हटवण्याची मागणी करत प्रशासनाला इशारा दिला असून, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
नागभीड तालुक्यातील जनकापुर येथे सप्टेंबर 2025 मध्ये भारती एअरटेल कंपनीने मोबाईल टॉवर उभारला. मात्र, हा टॉवर उभारताना आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. कंपनीने ओएफसी केबल लाईन टाकण्यासाठी ग्रामपंचायतीकडे परवानगी मागितली होती; परंतु संबंधित जागेच्या मालकीचे सातबारा उतारे, नमुना आठ, नकाशा, कंपनीसोबतचा करार आदी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नव्हती.
यामुळे दिनांक 25 जुलै 2025 रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत बहुमताने कंपनीला ‘ना हरकत’ प्रमाणपत्र न देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतरही आजपर्यंत अशा प्रकारचा कोणताही ठराव मंजूर झालेला नसल्याचे ग्रामपंचायत जनकापुरने स्पष्ट केले आहे.
तरीसुद्धा, नियमांची पायमल्ली करत कंपनीने गावात ओएफसी केबल लाईन टाकून मोबाईल टॉवर उभारल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते ब्रम्हदास रघुनाथ शेंडे यांनी विविध शासकीय कार्यालयांकडे वारंवार तक्रारी व निवेदने सादर केली आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, तहसील कार्यालय नागभीड, संवर्ग विकास अधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, ग्रामपंचायत जनकापुर तसेच अप्पर तहसीलदार तळोधी बा. यांच्याकडे लेखी तक्रारी दिल्या आहेत.
विशेष म्हणजे, संबंधित अधिकाऱ्यांनी मोबाईल टॉवर अवैध असल्याचे अहवाल व निवेदन स्वीकारले असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “अवैध मार्गाने उभारलेल्या कामाला प्रशासन किती दिवस संरक्षण देणार?” असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते ब्रम्हदास शेंडे व भाग्यश्री शेंडे यांनी प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे.
येत्या सात दिवसांत अवैध मोबाईल टॉवर व ओएफसी केबल लाईन हटवण्यात आली नाही, तर तहसील कार्यालय नागभीड समोर सपत्नीक आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या संभाव्य आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासन चंद्रपूर व ग्रामपंचायत जनकापुर यांच्यावर राहील, असेही त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. या प्रकरणी प्रशासन पुढील काही दिवसांत कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.