Chandrapur News | जांभुळघाट आश्रमशाळेच्‍या मुख्याध्यापकांनंतर अधीक्षकाचेही निलंबन 
चंद्रपूर

Chandrapur News : मुख्याध्यापकांनंतर अधीक्षकाचेही निलंबन; फोटो व्हायरल करणाऱ्या शिक्षकावर कारवाईची टांगती तलवार

जांभूळघाट आश्रमशाळेतील अर्धमुंडन प्रकरणाला गंभीर वळण, हायक शिक्षकाचा अहवाल अपर आयुक्तांकडे

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Jambhulghat Ashram

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चिमूर आदिवासी प्रकल्पांतर्गत जांभूळघाट येथील शासकीय आदिवासी पोस्ट बेसिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे अर्धमुंडन व टक्कल केल्याच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांचे केस कर्तन प्रकरणात शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत गिरी यांच्यानंतर अधीक्षक प्रशांत आत्राम यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांनी ही कारवाई केली असून, निलंबनाच्या कालावधीत प्रशांत आत्राम यांचे मुख्यालय शासकीय आश्रमशाळा रूपापेठ, ता. कोरपना येथे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल करणाऱ्या सहायक शिक्षकावरही कारवाईची शक्यता असून, त्याबाबतचा अहवाल चिमूर प्रकल्प अधिकाऱ्यांनी अपर आयुक्तांकडे पाठविल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

२६७ विद्यार्थ्यांच्या केस कर्तनाचा प्रकार

जांभूळघाट येथील ही निवासी आश्रमशाळा असून येथे सुमारे साडेपाचशे विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. शनिवारी दुपारी चार वाजतापासून रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांचे केस कर्तन करण्यात आले. या कामासाठी शाळेकडून एका नाभिकाची नियुक्ती करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे २६७ विद्यार्थ्यांचे केस ट्रिमरच्या साहाय्याने कापण्यात आले. सुरुवातीला ८२ विद्यार्थ्यांचे अर्धमुंडन करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर पहाटेपर्यंत विद्यार्थ्यांचे पूर्ण केस कापण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे टक्कल का करण्यात आले, याबाबत प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत आहे.

अधीक्षकांच्या उपस्थितीत प्रकार झाल्याचा आरोप

विद्यार्थ्यांचे अर्धमुंडन करण्यात आले, त्यावेळी अधीक्षक प्रशांत आत्राम उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या सूचनेनुसार हा प्रकार घडल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. यापूर्वी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे साध्या पद्धतीने केस कर्तन केले जात होते. अशा प्रकारे अर्धमुंडन किंवा टक्कल करण्याची पद्धत यापूर्वी कधीही नव्हती, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. घटना घडली त्यावेळी मुख्याध्यापक प्रशांत गिरी हे शाळेत उपस्थित नव्हते. परत आल्यानंतर त्यांना या प्रकाराची माहिती मिळाल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणाची दखल घेत त्यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर आज मंगळवारी अधीक्षक प्रशांत आत्राम यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली.

फोटो व्हायरल करणाऱ्या शिक्षकावरही कारवाईची शक्यता

या घटनेचे विद्यार्थ्यांचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे वरिष्ठ प्रशासनाला या घटनेची तातडीने दखल घ्यावी लागली. चिमूर प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. या चौकशीत शाळेतील सहायक शिक्षकाने आपल्या मोबाईलद्वारे या घटनेचे फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याचे समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संबंधित शिक्षकाबाबतचा अहवाल अपर आयुक्तांकडे सादर करण्यात आला असून, त्यांच्यावरही विभागीय कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केस कर्तनाच्या खर्चावरही प्रश्नचिन्ह

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या केस कर्तनासाठी शासनाकडून प्रति विद्यार्थी सुमारे २५ रुपये खर्चाची तरतूद असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात नाभिकाला केवळ १५ रुपये दिले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल होत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, या आर्थिक आरोपांची अधिकृत पडताळणी झालेली नाही. त्यामुळे शासनाकडून करण्यात येणारी तरतूद, प्रत्यक्ष नाभिकाला दिलेली रक्कम आणि उर्वरित रकमेचा वापर याबाबत आर्थिक तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

शाळेतील अंतर्गत वादाचीही चर्चा

या प्रकरणाच्या पाहणीदरम्यान शाळेच्या प्रशासकीय वातावरणात दोन परस्परविरोधी गट असल्याची चर्चा समोर आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अंतर्गत वादामुळे शिक्षक आणि प्रशासनाचे लक्ष विद्यार्थ्यांचे शिक्षण व भवितव्य यापेक्षा इतर बाबींवर केंद्रित होत असल्याचा आरोप काही पालकांकडून करण्यात येत आहे. मात्र, या आरोपांचीही स्वतंत्रपणे पडताळणी होणे आवश्यक असून, चौकशीत याबाबत नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

स्वतंत्र चौकशी समितीची पालकांची मागणी

मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतरही पालकांचे समाधान झालेले नाही. या संपूर्ण प्रकरणाची अपर आयुक्त आदिवासी विकास, नागपूर यांनी स्वतंत्र चौकशी समिती गठित करून सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

“मुख्याध्यापक व अधीक्षकांचे निलंबन; शिक्षकाचीही चौकशी सुरू”

“या प्रकरणाची अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांनी गंभीर दखल घेत मुख्याध्यापक आणि अधीक्षकांचे निलंबन केले आहे. संबंधित सहायक शिक्षकाचीही चौकशी सुरू आहे,” अशी माहिती प्रकल्‍प अधिकारी जागृती कुमरे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT