चंद्रपूर : बनावट सोने विक्री करून फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा चंद्रपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चंदपूर शहरातील बाजारात सराफा दुकानात बनावट सोने विक्री करणाऱ्या टोळीला सोमवारी (दि.२४) जेरबंद करण्यात आले. ही मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
अतुल उर्फ मुखी बनाराम परमार (वय ३९, रा. नई आवादी, बोथला सराया, आगरा, उत्तरप्रदेश ), शुत्रघ्न सिताराम सोलंकी (वय ४०) रा. पश्चिमपुरी, दिपनगर आगरा, उत्तरप्रदेश) पुरन प्रेमचंद बघेल (वय ३८, रा. देवबलोदा, ता. पाटम, जि. दुर्ग, छत्तीसगड), श्रीमती लक्ष्मी सेवाराम राठोड (वय ५५, रा.. रेहीनाकी पुलीया, फैजीवाली गल्ली फिरोजाबाद आगरा, उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, चंद्रपुर शहरात बनावटी सोना विक्री करून फसवणूक करणारी टोळी भ्रमंती करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यामुळे शहरातील सराफा लाईन येथील सराफ व्यावयायिकांना सतर्क करण्यासाठी स्थानिक गुन्हे पोलिस अधिकारी मार्गदर्शन करीत होते. दरम्यान छोटा बाजार परिसरातील जया कलेक्शन या दुकानाचे मालक राकेश मंधानी ( रा. रामनगर चौक, चंद्रपुर) यांनी त्यांच्याकडे काही वेळापुर्वी तीन इसम व एक महिला सोना विक्रीसाठी आल्याचे सांगितले. त्यांनी सोन्याचे मणी दाखवून त्यांच्याकडे असलेली सोन्याची माळ आणणार आहे. त्यांच्याकडे सुमारे एक किलो सोने असल्याचे सांगून २० लाखात विकायचे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला दिली. त्यानुसार शहरात बनावट सोने घेऊन ही टोळी परिसरात आली असता त्यांना सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून ४ नग सोन्याचे मनी किमंत १५ हजार, पिवळया धातुचे बनावटी मनीची माळ वजन १.३६१ किलो ग्रॅम (बनावटी नकली सोन्याची) किमंत १ हजार, दोन वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल किमंत २ हजार असा एकूण १८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुग्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कांग्रेडवार, पोउपनि सुनिल गोरकार, पोहवा किशोर वैरागडे, पोहवा दिपक डोगरे, पोहवा सतिश अवबरे यांनी ही कारवाई केली.