Cattle Smuggling Chandrapur
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात संघटितपणे सुरू असलेल्या अवैध गोवंश तस्करीविरोधात चंद्रपूर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली. कुख्यात गोवंश तस्कर इमरान बब्बु शेख आणि त्याच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर मकोका लावण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई ठरली असून त्यामुळे अवैध तस्करी करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत होते. अवैध जनावरांची वाहतूक, दारूबंदी, जुगार, चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी सुरू असताना पोलिसांना खात्रीशीर मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, मूल ते चंद्रपूर मार्गावरून तेलंगणा राज्याकडे दोन मोठ्या ट्रकमधून गोवंशाची अवैध वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून टाटा कंपनीचे दोन संशयित ट्रक अडवले. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये एकूण ६३ गोवंश अत्यंत निर्दयतेने दाटीवाटीने कोंबलेले आढळले.
दोन जनावरांचा जागीच मृत्यू
पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या. जनावरांचे हात, पाय आणि तोंड आखूड दोऱ्यांनी घट्ट बांधण्यात आले होते. वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जनावरे भरून त्यांच्यासाठी चारा किंवा पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. अमानुष वाहतुकीमुळे दोन जनावरांचा जागीच मृत्यू झाला होता.
तपासणीदरम्यान आरोपींकडे पशुधन विकास विभागाचे वाहतूक प्रमाणपत्र, आरटीओचा जनावरे वाहतूक परवाना किंवा इतर कोणतीही वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत. आरोपी महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात गोवंशाची कत्तलीसाठी चोरटी वाहतूक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४४१/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपींवर प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे यांनी केला.
मकोका अंतर्गत कारवाई
टोळीप्रमुख इमरान बब्बु शेख आणि त्याचे साथीदार हे पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात यापूर्वीही संघटितपणे अवैध गोवंश तस्करीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सातत्याने संघटित गुन्हेगारी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी या टोळीविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सादर केला होता.
या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिनांक २५ मे २०२६ रोजी मकोका अंतर्गत कारवाईला मंजुरी दिली. त्यानुसार आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) अंतर्गत कठोर कलमे लावण्यात आली आहेत.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.