चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील धानोली गावालगतच्या देवघाट नाल्यातून अवैद्य दगड मुरमाचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या सहा हायवासह एक पोकलेन मशीन जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई काल रविवारी रात्री दहा हा वाजताच्या सुमारास महसूल विभागाचे अधिकाऱ्यांनी केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजुरा - राज्य सीमा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ बी चे मागील दोन वर्षापासून काम सुरू आहे. शासनाचे धोरण व नियमाला केराची टोपली दाखवत सदर कामाकरीता कोरपना तालुक्यातील धानोली येथील देवघाट नाल्यातून दगड, मुरुमाचे अवैध उत्खनन केले जात आहे. काल रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास एका पोकलेन मशीनद्वारे सहा हायवा ट्रकमध्ये दगड माती मुरूम भरून वाहतूक करण्याचा प्रयत्न सुरू होता. दरम्यान महसूल विभागाचे पथकाने नायब तहसीलदार चिडे यांच्यासह तलाठी व मंडल अधिकारी यांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईमध्ये सहा हायवा वाहन व एक पोकलेन मशीन जप्त करण्यात आली. सहा हायवा ट्रक तहसील कार्यालय परिसरात लावण्यात आले तर एक पोकलेन मशीन पोलीस पाटील यांच्याकडे सुपूर्द नाम्यावर देण्यात आली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई महसूल विभागाच्या पथकाने केली आहे.
सदर प्रकरण कारवाईसाठी तहसीलदार पल्लवी आखरे यांच्याकडे सादर केले आहे. तहसीलदार यांनी वाहन धारकांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहे. अवैध उत्खनन करणाऱ्या या वाहन चालकांवर महसूल विभाग पुढील कारवाई काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे रात्री उत्खनन न करण्याचे प्रशासनाचे स्पष्ट आदेश आहेत, परंतू प्रशासनाच्या आदेशाची अवहेलना करून अवैध उत्खननाचे प्रकार सर्रास सुरू आहेत. यापूर्वी अशा प्रकारच्या अनेकदा कारवाई करण्यात आल्या. परंतु त्यानंतर ही संबंधित महामार्गाच्या कन्ट्रक्शन कंपनीकडून अवैध उत्खनन करण्याची मुजोरी सुरूच आहे.