चंद्रपूर : राज्यभर उष्णतेची तीव्र लाट कायम असून विदर्भ अक्षरशः तप्त भट्टीत बदलला आहे. दुसऱ्या दिवशीही ब्रह्मपुरीने राज्यातीलच नव्हे तर देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या तापमानाचा विक्रम कायम राखत 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी ब्रह्मपुरीचा पारा 47 अंशांच्या वर राहिल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
विदर्भातील अनेक शहरांमध्ये तापमानाने 45 अंशांचा टप्पा पार केला असून रस्त्यांवर दुपारच्या वेळेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सकाळी अकरानंतरच उन्हाचा तडाखा असह्य होत असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. उष्ण वाऱ्यामुळे अंगाची अक्षरशः लाही-लाही होत आहे.
काल 47.1 अंश तापमानाची नोंद झालेल्या ब्रह्मपुरीने आज आणखी वाढ घेत 47.2 अंशांवर झेप घेतली. त्यापाठोपाठ वर्धा येथे 47.0 अंश तापमानाची नोंद झाली. उष्ण शहर म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातही उष्णतेचा कहर कायम असून आजचे तापमान 46.4 अंशांवर पोहोचले. अमरावती येथेही 46.4 अंश तापमान नोंदविण्यात आले.
जंगलांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातही उष्णतेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवत असून तेथील तापमान 46.0 अंशांवर पोहोचले आहे. नागपूरमध्ये 45.7, यवतमाळमध्ये 45.4 अंश तापमानाची नोंद झाली. अकोला येथे 44.8, गोंदिया येथे 44.6, बुलढाणा येथे 44.1 अंश तापमान नोंदविण्यात आले. तुलनेने वाशिम येथे 42.6 तर भंडारा येथे 42.0 अंश तापमान राहिले.
सतत वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळी बाजारपेठा ओस पडत असून अत्यावश्यक कामांशिवाय नागरिक बाहेर पडत नाहीत. शाळकरी मुले, वृद्ध आणि मजूर वर्गाला उष्माघाताचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. पुरेसे पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे तसेच उन्हात दीर्घकाळ काम टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.