मृत कामगार हरेंद्र राम  
चंद्रपूर

Chandrapur News | वेल्डिंगचे काम करताना उंचावरून पडून कामगाराचा मृत्यू : घुग्घुसमधील लॉयड्स मेटल्सच्या पॉवर प्लांटमध्ये अपघात

कंत्राटदार व प्रकल्प व्यवस्थापनाच्या सुरक्षा उपाययोजनांची चौकशी करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर, : औद्योगिक नगरी घुग्घुस येथील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या नवीन पॉवर प्लांट विस्तार प्रकल्पात सोमवारी सकाळी भीषण अपघात होऊन ३८ वर्षीय कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. उंचावर वेल्डिंगचे काम करीत असताना खाली कोसळल्याने बिहारमधील हरेंद्र राम यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे प्रकल्पातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

हरेंद्र राम हे बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील गोपालपूर येथील रहिवासी होते. मागील काही महिन्यांपासून ते एमसीके कुट्टी इंजिनिअरिंग या कंत्राटदार कंपनीमार्फत वेल्डर म्हणून लॉयड्स मेटल्सच्या नवीन पॉवर प्लांट विस्तार प्रकल्पात काम करीत होते. सोमवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास प्रकल्पस्थळी वेल्डिंगचे काम सुरू असताना ते अचानक उंचावरून खाली कोसळले. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर हरेंद्र राम यांचा मृतदेह कंपनीच्या मागील उसगाव मार्गे चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. मंगळवारी नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती आहे. घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हरेंद्र राम यांच्या पश्चात पत्नी अन्ना देवी आणि दोन मुले असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आणि मुलांच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कंपनी तसेच संबंधित कंत्राटदाराकडून मृत कामगाराच्या कुटुंबाला योग्य आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुरक्षा साधने होती का?

लॉयड्स मेटल्सच्या नवीन पॉवर प्लांट विस्ताराचे काम मागील सुमारे दोन वर्षांपासून सुरू आहे. या प्रकल्पात विविध कंत्राटदार कंपन्यांमार्फत बाहेरील राज्यांतील मोठ्या संख्येने कामगार कार्यरत असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत उंचावर वेल्डिंगसारखे धोकादायक काम करताना कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, सेफ्टी हार्नेस आणि इतर संरक्षणात्मक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली होती का, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जर आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली होती, तर कामगार उंचावरून खाली कसा कोसळला, याची चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच सुरक्षा साधने उपलब्ध नसतील किंवा त्यांचा वापर सुनिश्चित करण्यात आला नसेल, तर कंत्राटदार कंपनी आणि प्रकल्प व्यवस्थापनाकडून सुरक्षा नियमांचे पालन झाले का, याचीही तपासणी होणे गरजेचे आहे.

निष्पक्ष चौकशीची मागणी

हरेंद्र राम यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रकल्पात उंचावर काम करणाऱ्या कामगारांसाठी आवश्यक सुरक्षा मानकांचे पालन केले जात आहे का, सुरक्षा उपकरणांची उपलब्धता आणि वापराची नोंद ठेवली जाते का, तसेच कंत्राटदारांकडून कामगारांच्या सुरक्षेबाबत आवश्यक खबरदारी घेतली जाते का, याची तपासणी होणे आवश्यक आहे.

एका कामगाराचा मृत्यू हा केवळ एक आकडा नसून, त्यामागे एक कुटुंब, पत्नी आणि दोन मुलांचे भविष्य असते. त्यामुळे हरेंद्र राम यांच्या कुटुंबाला योग्य नुकसानभरपाई व आर्थिक मदत मिळावी, तसेच या दुर्घटनेमागील कारणे स्पष्ट करून निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT