Chandrapur News | घोडाझरी उपकालव्याच्या दुरुस्तीला युद्धपातळीवर सुरुवात; फुटलेल्या ठिकाणी पोकलेनद्वारे काम सुरू 
चंद्रपूर

Chandrapur News | घोडाझरी उपकालव्याच्या दुरुस्तीला युद्धपातळीवर सुरुवात; फुटलेल्या ठिकाणी पोकलेनद्वारे काम सुरू

ओवाळा परिसरातील शेतांतील पाणी ओसरले; पावसामुळे दुरुस्तीत अडथळे, काम पूर्ण होताच पुन्हा पाणी सोडण्याची तयारी

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या मुख्य कालव्यातून घोडाझरी उपकालव्यात प्रथमच पाणी सोडल्यानंतर काही तासांतच तळोदी–बाळापूर मार्गावरील ओवाळा गावाजवळ कालवा फुटल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर गुरुवारपासून संबंधित विभागाने फुटलेल्या ठिकाणी युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे हाती घेतली असून पोकलेन मशीनच्या साहाय्याने कालव्याचा बांध मजबूत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर आवश्यकतेनुसार पुन्हा कालव्यात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या मुख्य कालव्यातून ब्रह्मपुरी, नागभीड आणि सिंदेवाही तालुक्यातील शेतीसाठी उभारण्यात आलेल्या ५५ किलोमीटर लांबीच्या घोडाझरी उपकालव्यात सोमवारी प्रथमच पाणी सोडण्यात आले होते. तब्बल १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कालव्यात पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सायंकाळी तळोधी बा. जवळील ओवाळा गावाजवळ कालवा फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी शेतांमध्ये शिरले आणि अनेक शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. या घटनेत काही शेतकऱ्यांच्या धान पिकांचे तसेच रोवणीसाठी तयार ठेवलेल्या धानपऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली. कालव्यातील पाणी रात्रभर शेतात वाहत राहिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान, गुरुवारपासून घोडाझरी उपकालवा विभागाने दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत. फुटलेल्या ठिकाणी पोकलेन मशीनच्या साहाय्याने भगदाड बुजविण्याचे आणि कालव्याचा बांध मजबूत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठीही पोकलेनद्वारे मार्ग मोकळा करण्यात आला. त्यामुळे आता घटनास्थळ परिसरातील शेतांमधील पाणी पूर्णपणे ओसरले आहे.

मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत आहेत. सततच्या रिमझिम पावसामुळे आणि जड यंत्रसामग्री वापरण्यात येत असल्याने कामाचा वेग मंदावला आहे. तरीही दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

आज संबंधित कार्यकारी अभियंता सुहास मोरे, उप अभियंता आकाश शेडगे, शाखा अभियंता संजय नंदनवार या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी ठाण मांडून कालवा दुरुस्तीच्या कामाकरिता पुढाकार घेतला आहे. आज त्यांनी कालव्याची पाहणी केली आणि भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन केले. त्यानुसार दुरुस्तीचे काम सुरू असून कालव्याचा बांध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर कालव्याची तांत्रिक तपासणी करण्यात येईल. त्यानंतर शेतीच्या गरजेनुसार पुन्हा कालव्यात पाणी सोडण्याची तयारी विभागाने दर्शविली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT