Chandrapur News | घोडाझरी तलावाचे पाणी पुन्हा सुरू; शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश! 
चंद्रपूर

Chandrapur News | घोडाझरी तलावाचे पाणी पुन्हा सुरू; शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश!

रात्री अचानक कालव्याचे पाणी बंद केल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश; चार तासांच्या ठिय्यानंतर सिंचन विभागाचा निर्णय, १८ तासांनंतर पाणी प्रवाहित

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील ब्रिटिशकालीन घोडाझरी तलावाच्या कालव्याचे पाणी रविवारी (दि. १८ ऑक्टोबर) रात्री १० वाजताच्या सुमारास सिंचन विभागाने अचानक बंद केल्याने नागभीड आणि सिंदेवाही तालुक्यांतील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. सोमवारी सकाळी शेतात पाणी पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना कालव्यात पाणी येत नसल्याचे दिसताच धक्का बसला.

त्यानंतर शेतकऱ्यांनी घोडाझरी तलावावर धाव घेत पाणी सुरू करण्याची मागणी करीत ठिय्या आंदोलन केले. अखेर शेतकऱ्यांच्या आक्रोशाची दखल घेत सिंचन विभागाच्या वरिष्ठांनी पाणी सोडण्यास हिरवा कंदील दिला. सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तब्बल १८ तासांनंतर कालव्यात पुन्हा पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, सध्या शेतकरी आपल्या शेतात पाणी वळविण्यात व्यस्त आहेत. मात्र, तलावातील मर्यादित पाणीसाठा आणि पुढील सिंचनाबाबत वरिष्ठांचा निर्णय काय असणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 सकाळी पाणी बंद असल्याचे लक्षात येताच शेतकरी आक्रमक

धान पीक काढणीच्या अंतिम टप्प्याकडे जात असताना त्याला शेवटच्या पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत रविवारी रात्री अचानक कालव्याचे पाणी बंद करण्यात आले. सोमवारी सकाळी शेतात पाणी पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना कालवा कोरडा असल्याचे दिसले. याबाबत त्यांनी सिंचन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून विचारणा केली असता, रात्रीच तलावातून पाणी सोडणे बंद करण्यात आल्याचे त्यांना समजले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप पसरला.

यानंतर आज सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शेतकरी मोठ्या संख्येने घोडाझरी तलावावर एकत्र जमू लागले. अचानक पाणी बंद केल्याने ऐन हंगामात धान पीक संकटात सापडण्याची भीती व्यक्त करीत त्यांनी आपली व्यथा मांडली. पिकाला शेवटचे पाणी मिळाले नाही, तर धानपीक करपून आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

 ३० ऑक्टोबरपर्यंत पाणी देण्याची मागणी

घोडाझरी तलावावर दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास सिंचन विभागाचे उपअभियंता श्री. लिलारे, वालदे तसेच गोविंदपूर कार्यालयाचे उघडे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी तलावांतर्गत असलेल्या १४ पाणीवापर व वितरण संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी, माजी जिल्हा परिषद सदस्य खोजराज मरसकोल्हे आणि विनोद बोरकर उपस्थित होते.

बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आपल्या मागण्या ठामपणे मांडल्या. ३० ऑक्टोबरपर्यंत कालव्याचे पाणी सुरू ठेवावे अशी आग्रही मागणी त्यांनी केली. धान पीक सध्या अंतिम टप्प्यात असून, या वेळी मिळणारे शेवटचे पाणी उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आता पाणी बंद केले, तर वर्षभराची मेहनत वाया जाईल आणि मोठे आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेऊ नये, अशी भावनिक साद त्यांनी घातली.

माजी जिल्हा परिषद सदस्य खोजराज मरसकोल्हे, विनोद बोरकर आणि पाणीवाटप संस्थांच्या प्रतिनिधींनीही शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडली. दुपारी १२ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत शेतकरी तलावावर ठिय्या देऊन बसले होते.

 वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतर पाणी सुरू

शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका आणि पिकांची गरज लक्षात घेऊन उपअभियंता श्री. लिलारे यांनी चंद्रपूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना परिस्थितीची माहिती दिली. शेतकऱ्यांची मागणी आणि धान पिकाची सद्यस्थिती याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा झाल्यानंतर पाणी सोडण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास तलावाच्या वितरण नलिकेतून पुन्हा पाणी सोडण्यात आले.तब्बल १८ तासांनंतर पाणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पाणी पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, त्यांनी आपल्या शेतांकडे धाव घेत सिंचनाच्या कामाला सुरुवात केली.

सध्या घोडाझरी कालव्यातून पाणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, तलावातील अत्यल्प पाणीसाठा आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पुढील काळात पाणीपुरवठा किती दिवस सुरू राहणार, हा प्रश्न कायम आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पुढील निर्णय घेतला जाणार असल्याने दोन दिवसांनंतर नेमकी काय कार्यवाही होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

एकीकडे धान पिकाला अंतिम टप्प्यात पाण्याची नितांत गरज आहे, तर दुसरीकडे भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन तलावातील साठा राखणेही आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आव्हान आता सिंचन विभागासमोर उभे ठाकले आहे.

तलावात केवळ साडे अठरा टक्के पाणीसाठा  सध्या तलावात सुमारे साडे अठरा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तलावात २० टक्के पाणीसाठा राखून ठेवणे आवश्यक आहे. मात्र, धान पिकाला पाण्याची गरज असल्याने शेतकऱ्यांची मागणी विचारात घेऊन सध्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. यापूर्वीही पाणीसाठा कमी असल्याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली होती. पुढील कार्यवाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार करण्यात येईल.
: श्री लिलारे, उप अभियंता  सिंचन विभाग सिंदेवाही 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT