चंद्रपूर : सिन्देवाही शहरातील महालक्ष्मी नगरातील दोन शाळकरी मुलांचा बोकडोह नदीत फुटबॉल खेळत असताना बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि.16 ऑगस्ट) दुपारी साडेबाराच्या सुमारास टेकरी गावाजवळील पुलाजवळ घडली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जीत टिकाराम वाकडे (वय १६ ) आणि आयुष दिपक गोपाले (वय १५ ) रा . महालक्ष्मी नगर, सिन्देवाही अशी मृतांची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिन्देवाही येथे आज शनिवारी फुटबॉल ची मॅच होती. मॅच खेळल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास 10 ते 12 मुले तालुक्यातील टेकरी गावाजवडील बोकडोह नदीत पोहण्याच्या उद्देशाने गेलेत.
त्यांनी फुटबॉलसह नदीत उतरून पाण्यात खेळण्यास सुरुवात केली. पाण्यात एकमेकांकडे फुटबॉल फेकून खेळत असतानाच ही दुर्घटना घडली. खेळताना अचानक जीत व आयुष यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडू लागले. मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला.
घटनेची माहिती मिळताच सिन्देवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर गोताखोरांच्या सहाय्याने दोन्ही मुलांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेने सिन्देवाही शहरात शोककळा पसरली आहे.