Akapur Farmer Death
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील आकापूर शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी अशोक लक्ष्मण वेटे (वय ५५) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.२५) सकाळी उघडकीस आल्यानंतर संतप्त नागरिकांनी वनविभागाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त करून मृतदेह उचलण्यास नकार दिला आणि वनपरिक्षेत्र अधिकारी शहा मॅडम यांना घेराव घातला. अखेर तीन चार तासानंतर शहा यांनी नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासोबतच विविध मागण्या अवघा तीन दिवसांत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासनानंतरच मृतदेह उचलण्यात आला आणि घेराव मागे घेण्यात आला.
शुक्रवारी (दि.२४) संध्याकाळी नागभीड तालुक्यातील आकापूर येथील शेतकरी अशोक वेटे हे आपल्या शेतावर धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र, ते रात्रीपर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधमोहीम सुरू केली. परंतु त्यांचा पत्ता लागला नाही. आज सकाळी पुन्हा शोध घेण्यात आला असता आकापूर शिवारात त्यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासानुसार दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून त्यांचा मृत्यू केल्याचे समोर आले आहे.
गेल्या आठवडाभरापासून वाघाचा वावर या परिसरात असल्याची माहिती नागरिकांनी आधीच वनविभागाला दिली होती, तरीही कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नाही. वन विभागाच्या निष्काळजीपणामुळेच शेतकऱ्याचा जीव गेला, असा आरोप करत नागरिकांनी सकाळपासूनच आकापूर शिवारात शहा मॅडम यांना घेराव घातला. त्यामुळे घटनास्थळी प्रचंड असंतोष उफाळून आला. जोपर्यंत वाघाला पकडले जात नाही आणि शेतकरी-शेतमजुरांच्या सुरक्षिततेची हमी दिली जात नाही, तोपर्यंत मृतदेह उचलला जाणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे बराच वेळ मृतदेह घटनास्थळीच होता. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
परिस्थिती चिघळू नये म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी शहा मॅडम यांनी नागरिक, मृतकाचे कुटुंबीय तसेच स्थानिक प्रशासनाशी चर्चा सुरू केली. जवळपास तीन तास चाललेल्या चर्चेनंतर अखेर नागरिकांच्या पाच मागण्या मान्य करून त्या तीन दिवसांत पूर्ण करण्याचे लेखी हमीपत्र ग्रामपंचायतीला देण्यात आले.
शहा यांनी लेखी हमीपत्रात वेठे या शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या आकापूर परिसरातील नरभक्षक वाघाला तातडीने जेरबंद करणार, शेती व गावालगतच्या जंगल परिसरात तारेचे कुंपण करणार, तळोधी –आकापूर, बाळापूर–आकापूर व देवपायली–बाळापूर रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाढलेले झाडेझुडपे साफ करणार, वन्यप्राण्यांमुळे धान पिकाचे झालेले नुकसान भरपाई तातडीने देणार, हंगाम काळात शेतकऱ्यांना वनविभागाच्या संरक्षण पथकाद्वारे सुरक्षा पुरविणार आदी मागण्या अवघ्या तीन दिवसांत पूर्ण करण्याचे लेखी हमीपत्र मिळाल्यानंतर नागरिकांचा रोष निवळला शहा यांना घातलेला घेराव मागे घेऊन मृतदेह उचलण्यास कुटुंबीय तयार झाले.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले . ण्यात आला. वनविभागाच्या वतीने मृतकाच्या कुटुंबीयांना २५ हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
घटनेनंतर तळोधी -बाळापूर वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी वाघाच्या शोधासाठी ॲक्शन मोडवर आले असून, परिसरात पिंजरे लावण्याचे आणि गस्त वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या घटनेनंतर आकापूर आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “वनविभागाने ठोस उपाययोजना न केल्यास आणखी हानी होऊ शकते,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
आकापूर शिवारात घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा वाघ-मानव संघर्षाचा मुद्दा समोर आणला आहे. वनविभागाने केवळ तात्पुरते नव्हे, तर दीर्घकालीन उपाययोजना करूनच ग्रामीण जनतेचा विश्वास परत मिळवावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.