Chandrapur Fire News | चंद्रपूर शहर मोठ्या आगीपासून थोडक्यात बचावले!  
चंद्रपूर

Chandrapur Fire News | चंद्रपूर शहर मोठ्या आगीपासून थोडक्यात बचावले!

गणेश नगर परिसरातील कचऱ्याला आग; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला, कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : प्रचंड उष्णता, जोरदार वारे आणि मोकळ्या जागेत टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे शनिवारी दुपारच्या सुमारास चंद्रपूर शहरातील गणेश नगर परिसरात भीषण आग लागून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत घरातील पाण्याच्या सहाय्याने सुरुवातीला आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केल्याने आणि नंतर अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून कारवाई केल्याने शहरातील मोठा भाग वाचला.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश नगर परिसरातील प्रा. सुरेश चोपणे यांच्या घराजवळील मोकळ्या जागेत काही अज्ञात व्यक्तींनी कचऱ्याला आग लावली. या ठिकाणी महानगरपालिकेचा तसेच नागरिकांकडून टाकण्यात येणारा विविध प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणावर साचलेला असतो. यात प्लास्टिक, कापड, जैविक कचरा, झाडांचा पालापाचोळा तसेच इतर ज्वलनशील पदार्थांचा समावेश असल्याने आग वेगाने भडकली.

दुपारी १२ वाजेनंतर लागलेली ही आग उष्णतेमुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे काही क्षणातच विक्राळ स्वरूप धारण करू लागली. आग शहराच्या दिशेने सरकत असल्याचे लक्षात येताच प्रा. सुरेश चोपणे आणि परिसरातील नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत घरातील पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचवेळी अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. स्थानिकांच्या मते, अग्निशामक दलाचे वाहन काहीसे उशिराने घटनास्थळी पोहोचले. मात्र त्यानंतरही जवळपास एक तास आग पूर्णपणे नियंत्रणात येत नव्हती. मोठ्या प्रयत्नांनंतर आगीची तीव्रता कमी करण्यात यश आले.

नागरिकांनी व्यक्त केलेल्या चिंतेनुसार, अग्निशामक दल आणखी उशिरा पोहोचले असते तर ही आग गणेश नगर, वरोरा नाका, पत्रकार संघ कार्यालय परिसर तसेच नागपूर रोडपर्यंत पसरून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता होती. या घटनेनंतर शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित जागी वारंवार तक्रारी करूनही कचरा टाकला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा मोकळ्या जागांमध्ये साचलेला कचरा धोकादायक ठरत असून छोटी ठिणगीही मोठ्या दुर्घटनेचे रूप घेऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

पुढील आठवडाभर उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक वार्डातील कचरा तातडीने हटवून महानगर पालिकेने योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. अन्यथा शहरात अशा घटना पुन्हा घडू शकतात आणि मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
◾प्रा. सुरेश चोपणे, चंद्रपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT