Ballarshah Kazipet Leopard Killed by Train
चंद्रपूर : राजुरा वनपरिक्षेत्रातील चनाखा वनक्षेत्रातून जाणाऱ्या बल्लारशाह–काझीपेठ दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर एका दीड वर्षांच्या मादी बिबट्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ११ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. वन्यजीवांच्या सततच्या वावराच्या या भागात आवश्यक सुरक्षा उपाययोजना नसल्याने हा रेल्वे ट्रॅक वन्यप्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरतो आहे.
राजुरा वनपरिक्षेत्रातील विहिरगाव उपवनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चनाखा नियत वनक्षेत्राच्या कक्ष क्रमांक १६० मधून बल्लारशाह–काझीपेठ हा महत्त्वाचा रेल्वे ट्रॅक जातो. हा परिसर दाट जंगलाचा असून बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांचा नियमित वावर येथे आढळतो.
११ एप्रिल रोजी सकाळी सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका धावत्या रेल्वेगाडीची धडक बसून दीड वर्षांच्या मादी बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली.
स्थानिक नागरिक आणि वन्यजीव प्रेमींनी या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. संबंधित रेल्वे मार्गावर यापूर्वीही वन्यप्राण्यांचे मृत्यू झाले असून, वारंवार अशा घटना घडत असतानाही ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. वन्यजीवांसाठी अंडरपास, ओव्हरपास, फेन्सिंग तसेच संवेदनशील भागात रेल्वेगाड्यांचा वेग मर्यादित करण्यासारख्या उपायांची गरज वारंवार व्यक्त केली जात आहे. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने वन्यजीवांचे जीव धोक्यात येत आहेत.
या घटनेनंतर तरी प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.