Electrocution Father Son Death AI Image
चंद्रपूर

Chandrapur Electrocution Incident | चालू कुलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का; चंद्रपुरात बाप-लेकाचा मृत्यू

उष्णतेपासून बचावासाठी लावलेला कुलर ठरला जीवघेणा; इंदिरानगर परिसरात शोककळा

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Electrocution Father Son Death

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या तीव्र उष्णतेची लाट सुरू असून नागरिक उकाड्यापासून बचावासाठी घरांमध्ये कुलरचा वापर करत आहेत. मात्र, कुलरच जीवघेणा ठरल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (२८ मे) चंद्रपूर शहरातील इंदिरानगर रेल्वे पटरी परिसरात घडली. चालू कुलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का लागून बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चंद्रपूर शहरातील इंदिरानगर रेल्वे पटरीजवळ राहणारे वामन मांडवे हे गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या दरम्यान घरातील सुरू असलेल्या कुलरमध्ये पाणी टाकत होते. यावेळी अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. विजेचा धक्का बसताच ते खाली कोसळले.

वडील खाली पडल्याचे पाहून त्यांचा मुलगा राहुल मांडवे हा तातडीने त्यांच्या मदतीसाठी धावला. मात्र, वडिलांना वाचवण्याच्या प्रयत्नात राहुललाही विजेचा तीव्र धक्का बसला. या भीषण दुर्घटनेत बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अचानक घडलेल्या या दुर्दैवी प्रकारामुळे संपूर्ण इंदिरानगर परिसरात शोककळा पसरली असून मांडवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेमुळे कुलर, एसी आणि इतर विद्युत उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उन्हाळ्यापूर्वीच महावितरणकडून नागरिकांना विजेच्या सुरक्षिततेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. कुलरची वायरिंग योग्य प्रकारे तपासून घ्यावी, अर्थिंग व्यवस्थित असावी तसेच सुरू असलेल्या कुलरमध्ये पाणी टाकताना प्रथम वीजपुरवठा बंद करावा, अशा सूचना महावितरणने दिल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT