Mool bike accident
चंद्रपूर : मूल शहराजवळील सोमनाथ मार्गावर आज (दि. 8) दुपारी झालेल्या दोन दुचाकींच्या समोरासमोरच्या भीषण धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बापलेकांचा समावेश असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मूल शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमनाथ मार्गावरील बलकी देव मंदिराजवळ आज बुधवारी दुपारी साडेबाजच्या सुमारास दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत यश देविदास शेंडे (वय 22), त्याचे वडील देविदास कवडू शेंडे (वय 45) रा. मारोडा आणि वासूदेव किसन सहारे (वय 45) रा. शिवापूर चक, भादूर्णी अशी तिन्ही मृतांची नावे आहेत.
शेंडे बापलेक शेतीच्या कामानिमित्त मूल येथे आले होते. काम आटोपून ते आपल्या एमएच 34 बीएस 8863 या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून मारोडा गावाकडे परत जात होते. त्याच वेळी वासूदेव सहारे हे आपल्या दुचाकीवरून मूलकडे येत होते. दोन्ही वाहने भरधाव वेगात असल्याने बलकी देव मंदिराजवळ समोरासमोर धडक झाली. धडकेचा जोर एवढा प्रचंड होता की, यश शेंडे आणि वासूदेव सहारे यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या देविदास शेंडे यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.
अपघातात दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला असून, मृतांच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या. अतिस्त्रावामुळे तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे मारोडा गावात शोककळा पसरली असून, बापलेकांचा मृत्यू वेदनादायक ठरला आहे.
दरम्यान, या अपघाताबाबत मूल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक व्यंकटेश डोनोडे पुढील तपास करीत आहेत.