चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सावली व वरोरा तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. ह्या दोन्ही घटना आज गुरुवारी (दि. ९ ओक ऑक्टोबर) उघडकीस आल्या. रेमाजी बाबाजी देशमुख (वय ५५) रा. मोखाळा आणि अनिल शंकर देवतळे (वय ४३), रा. माढेळीअशी मृतक शेतकऱ्यांची नावे आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावली तालुक्यातील मोखाळा येथील रेमाजी देशमुख यांना मोखाळा येथे दोन एकर शेती आहे. पत्नी कांता देशमुख ही आज सकाळी दही विकण्यासाठी गडचिरोली येथे गेली होती. मुलगा व सून हे दोघे वाशिम जिल्ह्यात सोयाबीन काढणीसाठी काल बुधवारी गेलेत. घरात केवळ नातवंडे होती. त्यांची नजर चुकवून रेमाजीने घरातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी दही विकून घरी आल्यावर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिस पाटील यांनी सावली पोलिसांना माहिती दिल्यानंतर ठाणेदार पुलूरवार हे पथकासह दाखल झाले.
पंचनामा करून शवविच्छेदनासाठी सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविले. दुसरी घटना वरोरा तालुक्यातील माढेळी येथे घडली. येथील शेतकरी अनिल देवतळे यांच्याकडे आठ एकर शेती आहे. त्यांच्यावर विविध कार्यकारी संस्थेचे दोन लाख ३० हजारांचे कर्ज होते. नेहमीप्रमाणे आज गुरुवारी सकाळी ८ वाजता स्वत:च्या शेतात गेले. तेथील घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ होऊनही घरी परत न आल्याने वडील शंकर देवतळे हे शेतात गेले असता ही घटना उघडकीस आली. याबाबत माढेळी पोलिसांना कळविल्यानंतर पंचनामा करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. या दोनही घटनांमुळे मोखाळा व माढेळी येथे हळहळ व्यक्त होत आहे.