चंद्रपूर : “आमच्या जमिनीवर आमचा हक्क आहे. आमच्या इच्छेविरुद्ध सुपीक शेतजमिनीचा एक इंचही ताबा घेऊ देणार नाही. मोबदला नको, एमआयडीसीची मान्यता रद्द करा,” असा ठाम निर्धार व्यक्त करीत गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या संघर्षाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद केला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या एमआयडीसीविरोधी आंदोलनाला आता व्यापक जनसमर्थन मिळत असून, माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीसाठी तब्बल ९०० ते १,००० शेतकरी एकत्र आले. केवळ निवेदन देण्यासाठी नव्हे, तर पिढ्यान्पिढ्या कसत असलेल्या सुपीक जमिनी वाचविण्याची आर्त हाक लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
गोंडपिपरी तालुक्यात प्रस्तावित एमआयडीसीमध्ये करंजी, वढोली, चेक पेल्लूर, वडकुली, चेक वडकुली, सिरसी देऊळवार, चेक बेरडी, बोरगाव, धानापूर, चेक बोरगाव, लिखितवाडा आणि खरारपेट या १२ गावांचा समावेश आहे. या परिसरातील जमीन अत्यंत सुपीक असून, शेती हाच हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे. अशा सुपीक जमिनी औद्योगिकीकरणाच्या नावाखाली संपादित करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
गोंडपिपरी तालुका औद्योगिक कृती संघर्ष समिती आणि शेतकरी एकता संघर्ष समितीच्या वतीने एमआयडीसीची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांची संमती नसताना कोणतीही भूसंपादन प्रक्रिया राबवू नये, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. यापूर्वीही शेतकऱ्यांनी विविध आंदोलने, निवेदने आणि न्यायालयीन लढा उभारला आहे. या प्रकरणात न्यायालयाने 'स्टेटस को' दिल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या या प्रकल्पासंदर्भात जनसुनावणीची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, १८ नोव्हेंबरपासून तालुक्यात सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचा संघर्ष अधिक तीव्र झाला. शेतकऱ्यांचा विरोध असतानाही जबरदस्तीने जमिनीची मोजणी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने थेट आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली. त्यावर शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय जबरदस्तीने मोजणी करता येणार नाही, अशी ठाम भूमिका मुनगंटीवार यांनी घेतली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना मोजणी थांबविण्याच्या सूचना देत खडे बोल सुनावले. त्यानंतर तूर्तास सर्वेक्षणाचे काम थांबविण्यात आले.
या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आपली व्यथा लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचत असून न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली. याच विश्वासातून २२ नोव्हेंबर रोजी चिंतलधाबा येथे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नियोजित कार्यक्रमस्थळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सुमारे ९०० ते १,००० शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन आपल्या व्यथा, संताप आणि मागण्या मांडल्या.
यावेळी शेतकऱ्यांनी एमआयडीसीची मान्यता रद्द करण्याचा मुद्दा विधानसभेत ठामपणे उपस्थित करावा, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे आणि शासनस्तरावर हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांच्याकडे केली. यावर मुनगंटीवार यांनी आठवडाभराच्या आत जिल्हाधिकाऱ्यांसोबत नियोजन भवनात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यानंतर उद्योगमंत्र्यांसोबत शेतकऱ्यांची बैठक घडवून आणण्याची ग्वाही दिली. प्रशासनाकडून कोणत्याही शेतकऱ्यावर जोरजबरदस्ती केली जाणार नाही, असा शब्द देतानाच शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी बाराही गावांतील शेतकऱ्यांच्या वतीने औद्योगिक कृती संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सुरज माडूरवार यांनी प्रास्ताविकातून गावकऱ्यांची भूमिका, सुपीक जमिनीचे महत्त्व आणि प्रस्तावित एमआयडीसीला असलेला तीव्र विरोध स्पष्ट केला. या वेळी शेतकरी एकता संघर्ष समितीचे अध्यक्ष मारोती भोयर, सचिव माधव लडके, सुदर्शन दुर्गे, अमित भसारकर, औद्योगिक कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय वडसकर, कल्पेश खरबनकर, संदेश निमगडे, गजानन ढवस, संतोष निकोडे यांच्यासह बाराही गावांतील समित्यांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.