कोरडा पडलेला गोसीखूर्द कालवा 
चंद्रपूर

Chandrapur Farmer News | खरीप हंगाम वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; गोसीखुर्द कालव्याला पाणी सोडण्याची मागणी

मागणीसाठी १४ जुलै रोजी शेतकरी एकवटणार : समाधानकारक पाऊस न पडल्याने पिके धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : एकीकडे महाराष्ट्राला समृद्धीचा मार्ग दाखविण्याची भाषा होत असताना दुसरीकडे अन्नदात्या शेतकऱ्याच्या शेतात पाण्याअभावी भेगा पडत आहेत. नागभीड तालुक्यासह परिसरात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांची रोवणीची कामे ठप्प झाली असून अनेक शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. या पार्श्वभूमीवर जनकपूर – आकापूर – गंगासागर हेटी मार्गे जाणाऱ्या गोसीखुर्द कालव्याला तात्काळ पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना, आकापूर यांच्या वतीने मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी 'चलो नागभीड' अंतर्गत निवेदन देण्यात येणार आहे.

परिसरात जून महिन्यापासून अपेक्षित पावसाने पाठ फिरविल्याने हजारो हेक्टर शेती कोरडी पडली आहे. धान रोवणीसाठी शेतकऱ्यांनी बियाणे, खते, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च केला; मात्र पावसाअभावी केलेला खर्च वाया जाण्याची वेळ आली आहे. दिवसेंदिवस पिके करपण्याची भीती वाढत असून शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला असून खरीप हंगाम हातातून निसटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे गोसीखुर्द धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. जनकपूर – आकापूर – गंगासागर हेटी मार्गे जाणाऱ्या कालव्याचे कामही मोठ्या प्रमाणात पूर्ण झालेले आहे. अशा परिस्थितीत पिके वाचविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कालव्याला तात्काळ पाणी सोडणे ही काळाची गरज असल्याचे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे.

'पाणी नाही तर पीक नाही आणि पीक नाही तर शेतकऱ्यांचे अस्तित्व धोक्यात येईल,' अशी भावना परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. धानाच्या एका रोपामागे शेतकऱ्याचा घाम, आशा आणि वर्षभराच्या उदरनिर्वाहाचे स्वप्न दडलेले असते. आज त्याच स्वप्नांवर दुष्काळाचे सावट गडद होत आहे.

या मागणीसाठी मंगळवार, दि. १४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता गोसीखुर्द कार्यालय, नागभीड येथे निवेदन सादर करण्यात येणार आहे. कालव्याच्या लाभक्षेत्रातील जनकपूर, आकापूर, गंगासागर हेटी तसेच परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या हक्काच्या पाण्यासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन शेतकरी संघटना, आकापूर, ता. नागभीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT