Chandrapur Cotton Farmer Record
चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि प्रभावी शेती व्यवस्थापनाच्या बळावर वरोरा तालुक्यातील पोहा येथील शेतकरी सुरेश पोतराजे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी ७० एकर क्षेत्रात कापसाची लागवड करून तब्बल ८५० क्विंटल उत्पादन घेतल्याने त्यांच्या यशाची सर्वत्र चर्चा होत आहे.
सन २०२५-२६ या वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना ‘बेस्ट फार्मर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागपूर येथे आयोजित इंडियन कॉटन कमिटी २०२६ कार्यक्रमात विदर्भ कॉटन असोसिएशनने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. विदर्भातील केवळ तीन शेतकऱ्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली होती.
सुरेश पोतराजे हे वरोरा तालुक्यातील सात ते आठ वेगवेगळ्या ठिकाणी भाडेतत्त्वावरील जमिनीवर शेती करतात. मर्यादित साधनसामग्रीतूनही त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि पीक व्यवस्थापनाच्या जोरावर कापूस उत्पादनात उल्लेखनीय यश मिळवले आहे.
पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांनी रासायनिक खतांचा मर्यादित वापर करून उत्पादन खर्च कमी करण्यावर भर दिला. तसेच कापसाच्या पिकाची योग्य पद्धतीने निगा राखत उत्पादन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
कृषी मंडळ अधिकारी विजय काळे आणि पारस अॅग्रोचे संचालक अमोल मुथा यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग करून पोतराजे यांनी शेतीतील नियोजन आणि व्यवस्थापन अधिक प्रभावी केले.
सुरेश पोतराजे यांचे हे यश वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, आधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रीय शेती पद्धतींचा अवलंब केल्यास शेतीत उल्लेखनीय यश मिळवता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.