Hatloni village farmer death incident
चंद्रपूर : अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेले मोठे नुकसान आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना हातलोणी (ता. कोरपना) येथे घडली आहे. गजानन पुनम मालेकर (वय 38) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सलग पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच जिल्हा बँकेचे कर्ज आणि आर्थिक संकटामुळे गजानन मालेकर मानसिक तणावाखाली होते. मंगळवारी रात्री त्यांनी घरीच विषारी औषध प्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला.
त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय, कोरपना येथे दाखल करण्यात आले. परंतु स्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
आज बुधवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. गजानन मालेकर यांच्या नावावर कुकुडबोडी शिवारात सुमारे एक हेक्टर शेती आहे. त्यामध्ये त्यांनी कापूस सोयाबीन पिकाची लागवड केली होती. परंतु सततचे पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत तो होता. याच कारणातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलून जीवन संपविले. मृताच्या मागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व मोठा परिवार आहे. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.