चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील गुजगव्हाण गावातील शेतकरी सुरेश विठ्ठल भुसारी यांनी स्वतःच्या नऊ एकर शेतातील सोयाबीन पीक ट्रॅक्टर चालवून नष्ट केले, ही घटना आज दिवाळीच्या दिवशी समोर आली आहे. अतिवृष्टीमुळे आधीच सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. शेतातून मिळणारे उत्पादन खर्चभरही येणार नसल्याने, अखेर भुसारी यांनी नाईलाजास्तव आपले पीक रोटावेटर फिरवून नष्ट करण्याचा निर्णय घेतला. तर चिमुर तालुक्यातील खामगाव येथील दलीत डेकोटे या शेतकऱ्याला 5 एकरात 4 पोती सोयाबीन झाले. एकरी 2500 हार्वेस्टर मशीनवाले घेतात त्यामुळे एकूण खर्च आला 12500. उत्पन्ना पेक्षा खर्च अधिक झाल्याने शेतकरी टोकाचा निर्णय घेत आहेत.
अतिवृष्टीने उद्ध्वस्त झाले पीक
यंदा खरीप हंगामात झालेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांप्रमाणेच चिमूर तालुक्यातील गुजगव्हाण परिसरातही सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुरेश भुसारी यांच्याकडे नऊ एकर शेती आहे. त्यांनी या वेळी शेतात सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. त्या लागवडीवर मोठा खर्च केला होता. परंतु सततच्या अतिवृष्टीने सर्व सोयाबीन पीक सडले नष्ट झाले. पावसाने सर्व मेहनत पाण्यात गेली. पाऊस थांबल्यानंतर जेमतेम उरलेले पीक काढण्यासाठी मजुरीचा खर्च परवडणारा नव्हता.
आर्थिक संकटात अडकले शेतकरी
भुसारी यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील रब्बी हंगामासाठी बियाणे, खत आणि जमीन कसण्यासाठी एकही पैसा नाही. "आता पेरणी कशी करावी?" असा प्रश्न भुसारीच नव्हे तर संपूर्ण शेतकरीवर्गासमोर उभा आहे.
शासनाकडे मदतीची मागणी
भुसारी यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन, कापूस आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी. अन्यथा अनेक शेतकरी अशाच प्रकारे आपले पीक नष्ट करण्याचा निर्णय घेतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
खर्च जास्त, उत्पन्न नाहीः सदर शेतकऱ्याला शेतातून सोयाबीन काढण्यासाठी मजुरांना ३,००० रुपये प्रति एकर मजुरी द्यावी लागणार होती. पण उत्पादन इतके कमी होते की तेवढा खर्च सुद्धा निघणार नव्हता. त्यामुळे आर्थिक गणित न बसल्याने आणि पुढील रब्बी हंगामासाठी हातात पैसाही नसल्याने, अखेर भुसारी यांनी शेतात ट्रॅक्टरद्वारे रोटावेटर चालवून पीक पूर्णपणे नष्ट केले.
"सातबारा कोरा"च्या आश्वासनाची आठवण
भुसारी यांनी सांगितले की, “निवडणुकांच्या काळात सत्ताधारी पक्षाने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण आज परिस्थिती भयानक आहे. सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. हे नुकसान कधीही भरून निघणारे नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतरच सरकार जागे होईल का? असा प्रश्न त्यांनी केला आहे.
पाच एकर शेतामध्ये फक्त चार पोते सोयाबीन झाले. सोयाबिन मळणीसाठी हार्वेस्टर वाले 2500 एकरी घेतात. पाच एकरातील सोयाबीन काढायला 12500 खर्च आला आणि सोयाबिन चार पोते झाले. पावसामूळे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे असे निर्णय त्यांना घ्यावे लागत आहे.: दलित डेकाटे, शेतकरी खामगाव, तालुका चिमूर