चंद्रपूर : वरोराचे भाजप आमदार करण संजय देवतळे यांच्या अधिकृत फेसबुक पोस्टवर करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह आणि बदनामीकारक टिप्पणीवरून वरोऱ्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी वरोरा भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष सुरेश पवार यांनी पोलिसांकडे निवेदन सादर करून संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आमदार करण देवतळे यांच्या अधिकृत फेसबुक पोस्टवर एका युजरने आक्षेपार्ह स्वरूपाची टिप्पणी केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून लोकप्रतिनिधीची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संबंधित फेसबुक अकाउंटची तांत्रिक माहिती मिळवून टिप्पणी करणाऱ्या व्यक्तीची ओळख निश्चित करावी, तसेच उपलब्ध डिजिटल पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. तसेच आक्षेपार्ह मजकूर पुढे प्रसारित होऊ नये, यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याची विनंती पोलिसांकडे करण्यात आली आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने चौकशी करून दोषी आढळणाऱ्या व्यक्तीवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी दिलीप घोरपडे, जगदीश तोटावार, अमित चवळे, अनिकेत नाकाडे, अजिंक्य नरडे, पंकज गाडगे, राहुल बंदूरकर, प्रशांत उलमले, सूरज केशवानी, अनिकेत मितलवार, शुभम गोल्हार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.