चंद्रपूर : सिन्देवाही तालुक्यातील शिवणी वनपरिक्षेत्रातील कुकडहेटी उपक्षेत्रातील जंगलात मोहफुल वेचायला गेलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना काल बुधवारी उघडकीस आली. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
भुमीता हरीदास पेंदाम (वय ५८) रा. कळमगाव असे मृतक महिलेचे नाव आहे. सद्या उन्हाळ्यात मोहफुल वेचनीचा हंगाम सुरू असल्याने नित्याप्रमाणे भुमीता ही काल सकाळी मोहफुल वेचन्याकरीता मोहबोळी बिटातील कक्ष क्र २७१ येथील जंगलात गेली होती. मोहफुल वेचत असताना दबा धरून असलेल्या पट्टेदार वाघाने महिलेवर हल्ला केला, त्यात ती ठार झाली. ही घटना दुपारी ३.३० वाजता उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती शिवणी वनविभागाला मिळताच वनाधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा पंचनामा केला आणि प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सिन्देवाही ग्रामीण रुग्नालयात पाठविण्यात आले.
शिवणी वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट , क्षेत्रसहाय्यक सुनिल बुल्ले, वांढरे, कोवे मेश्राम यांच्या उपस्थितीत मृतक महिलेच्या नातेवाईकांना ३० हजार रुपयाची मदत देण्यात आली आहे. मानव आणि वन्यजिव संघर्ष शिगेला पोहचला असून नेहमी कधी वाघ बळी ठरतो तर कधी वाघाच्या हल्यात मानव बळी पडतो. तरी यावर कायमस्वरूपी तोडगा काढून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.