चंद्रपूर : गेल्या अनेक शतकांपासून वरोरा तालुक्यात भूकंपाची कोणतीही नोंद झालेली नव्हती. मात्र, २४ सप्टेंबर रोजी नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप वरोरा तालुक्यात नोंदवला आहे. हा भूकंप जमिनीखालील सुमारे १० किमी खोलीवर केंद्रित होता. भूशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी यामागील कारणांवर सविस्तर प्रकाश टाकला आहे.
प्रा. चोपणे यांनी सांगितले की, “वरोरा परिसरात जमिनीचा भूभाग फारसा टणक नसला तरी आतापर्यंत भूकंप घडलेला नव्हता. येथील जमिनीत कोळसा आणि स्तरीत खडक मोठ्या प्रमाणात आहेत. या भूभागात जमिनीत खोलवर पाणी झिरपणे कठीण असते. परंतु, गेल्या काही वर्षांत कोळसा खाणींच्या उत्खननामुळे आणि नदीचे पाणी खोल खाणींमध्ये शिरल्याने (हायड्रो सिस्मोलॉजी प्रक्रिया) भूपट्ट हलला आणि भूकंप झाला आहे.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाणी जमिनीच्या ३ ते ४ किमी खोलीत शिरले. वेकोलीच्या खोल खाणींमधून हे पाणी प्रवेशल्याने भूपट्ट सरकला आणि भूकंपाची नोंद झाली. भविष्यात अशा प्रकारचे लहान भूकंप या परिसरात होण्याची शक्यता आहे.”
प्रा. चोपणे यांनी हेही नमूद केले की, चंद्रपूर जिल्ह्यात मूल ते सिरोंचा हा पट्टा नैसर्गिक भूकंपप्रवण आहे. मात्र, वरोरा तालुक्यातील हा भूकंप मानवनिर्मित कारणांमुळे झालेला असण्याची शक्यता आहे. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नाही. लोकांना फारसा त्रास जाणवला नाही. तरीही तज्ज्ञांच्या मते, भूभागातील मानवनिर्मित बदलांमुळे पुढील काही वर्षांत अशा लहान स्वरूपाच्या धक्क्यांची पुनरावृत्ती होऊ शकते.