चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील केळी गावाजवळ वना नदीपात्रात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत भाच्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेणाऱ्या मामाचा दुर्दैवी मृत्यू झाला. राहुल कोळसे (वय ३५) रा. शेकापूर बाई, ता. हिंगणघाट) असे मृतकाचे नाव असून, अवैध रेती उत्खननामुळे नदीपात्रात तयार झालेल्या खोल खड्ड्यात अडकून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना २७ मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कोळसे आपल्या नातेवाईकांसोबत केळी गावाजवळील वना नदी परिसरात गेले होते. दरम्यान, नदीत अंघोळ करत असताना त्यांचा भाचा अचानक खोल पाण्यात जाऊ लागला. भाच्याचा जीव वाचवण्यासाठी राहुल यांनी क्षणाचाही विलंब न लावता नदीत उडी घेतली. त्यांनी भाच्याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले, मात्र स्वतः खोल खड्ड्यात अडकले. नदीपात्रातील पाण्याची खोली आणि चिखलयुक्त खड्ड्यांमुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. उपस्थितांनी शोधाशोध सुरू केली, मात्र काही वेळाने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, वना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन सुरू असून, त्यामुळे नदीत अनेक धोकादायक खोल खड्डे निर्माण झाले आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच निष्पाप नागरिकांचा जीव जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजू तिमांडे यांनी घटनास्थळी भेट देत प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. “अवैध रेती उत्खननामुळे नदीपात्र मृत्यूचा सापळा बनले आहे. प्रशासनाने वेळेत कारवाई केली असती तर राहुल कोळसे यांचा जीव वाचला असता,” असे ते म्हणाले.
दरम्यान, नागरिकांनीही अवैध रेती घाट कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे. वारंवार होणाऱ्या दुर्घटनांनंतरही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा अवैध रेती उत्खननाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.