Chandrapur Drought हतबल शेतकऱ्याने उभ्या धान पिकात बांधली बैलं!  
चंद्रपूर

Chandrapur Drought : दुष्काळाच्या छाया गडद; हतबल शेतकऱ्याने उभ्या धान पिकात बांधली बैलं!

पावसाअभावी लोंब्या लागण्याच्या अवस्थेतील धान पीक करपले, कापणीचा खर्चही निघणे कठीण, वाळलेले पीक जनावरांच्या चाऱ्यासाठी सोडले

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : ऐन गरजेच्या वेळी पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. लाखो रुपये खर्च करून आणि रात्रंदिवस मेहनत घेऊन जोपासलेले धान पीक पाण्याअभावी डोळ्यांदेखत करपत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या भीषण परिस्थितीचे विदारक चित्र चिमूर तालुक्यातील खांबाडा येथील शेतकरी वामन ताजने यांच्या शेतात पाहायला मिळत आहे. हातातोंडाशी आलेले धान पीक वाळून गेल्याने त्यांनी आपल्या उभ्या पिकातच बैल आणि वासरे चरण्यासाठी बांधली आहेत. शेतकऱ्याच्या या अगतिकतेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

यंदा धान पीक जोमात असताना ऐन निर्णायक टप्प्यावर पावसाने पाठ फिरवली. परतीचा पाऊसही न झाल्याने आणि उन्हाची तीव्रता वाढल्याने शेतातील पाणी आटले आहे. जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या असून, धानाच्या लोंब्या लागण्याच्या अवस्थेतील पीक पाण्याअभावी करपून गेले आहे. पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या काळातच पाणी मिळाले नसल्याने शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.

 कापणीपेक्षा जनावरांना चारा देण्याचा निर्णय

धान लागवड, खते, औषधफवारणी आणि मशागतीसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला. मात्र, आता पीक वाळून गेल्याने त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची आशा मावळली आहे. अशा परिस्थितीत कापणीसाठी पुन्हा खर्च करणेही परवडणारे नसल्याने वामन ताजने यांनी वाळलेले पीक जनावरांच्या चाऱ्यासाठी सोडण्याचा निर्णय घेतला. ज्या शेतात काही दिवसांपूर्वी भरघोस उत्पन्नाची स्वप्ने पाहिली जात होती, त्याच शेतात आता बैल आणि वासरे चरत असल्याचे हृदयद्रावक चित्र दिसत आहे.

शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट

शेतीसाठी केलेला खर्चही निघण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. पाऊस नसल्याने पिकांचे नुकसान होत असताना पुढील हंगामासाठी भांडवल उभे करायचे कसे, असा प्रश्नही शेतकऱ्यांना सतावत आहे. पिकाचे नुकसान डोळ्यांदेखत सहन करण्याची वेळ आल्याने शेतकरी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खचत आहेत.

“डोळ्यांदेखत पीक जळताना पाहण्यापेक्षा जनावरांना तरी चारा मिळेल,”** अशी आर्त भावना या परिस्थितीतून व्यक्त होत आहे. खांबाडा येथील हे चित्र केवळ एका शेतकऱ्याची व्यथा नसून, पावसाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या वेदनेचे प्रतीक ठरत आहे. पिकांच्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून बाधित शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होत आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT