Dr Mundhada Hospital Theft Case  Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Theft | डॉ. मुंधडा हॉस्पिटलमधील चोरीचा छडा; ६० हजारांची रोकड चोरणाऱ्यास अटक, एक जण फरार

चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Dr Mundhada Hospital Theft Case

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील डॉ. मुंधडा हॉस्पिटलमध्ये झालेल्या चोरीच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत उलगडा करत एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून चोरीला गेलेली ६० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.

दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी फिर्यादी मनिष गोपाल मुंधडा (वय ४८) रा. दीक्षित वार्ड, पंचशील वार्ड, चंद्रपूर) यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ४ एप्रिल २०२६ रोजी ते नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजता हॉस्पिटलमध्ये आले होते. दिवसभर रुग्ण तपासणी केल्यानंतर ते घरी गेले असता रात्रीच्या सुमारास अज्ञाताने हॉस्पिटलच्या कॅबिनमध्ये प्रवेश करून लाकडी आलमारीतील ६० हजार रुपयांची रोकड चोरी केली. या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विनोद भुरले व त्यांच्या पथकाने गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी श्रीकांत उर्फ बोटतुट्या राजू चुनारकर (वय २३, रा. आनंदनगर, महाकाली कॉलरी, चंद्रपूर) याला ताब्यात घेतले.

तपासादरम्यान आरोपीकडून चोरीला गेलेली ६० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी आरोपीला चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणात अतुल उर्फ मुजोर विकास राणा (वय २५, रा. शामनगर, चंद्रपूर) हा आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT