चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आणि सिंदेवाही तालुक्यात दोन धक्कादायक घटना आज रविवारी (१५ जून) उघडकीस आल्या. सिंदेवाही तालुक्यातील जामसाळा (नवीन) येथे घरगुती वादातून पत्नीने रागाच्या भरात पतीचा रुमालाने गळा आवळून खून केला तर दुसरीकडे राजुरा शहरातील रमाबाई वार्डमध्ये घरात एकटी झोपलेल्या किराणा दुकान चालवणाऱ्या ५३ वर्षीय महिलेला अज्ञात इसमाने धारदार हत्याराने कपाळावर वार करून ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे.
सिंदेवाहीत पती दुर्वास याच्या हत्या प्रकरणात पत्नी वैशाली दुर्वास चौधरी (वय ३२) हिला अटक करण्यातआली आहे. तर राजुरा येथे कविता लक्ष्मण रायपुरे (वय 53) हिच्या हत्या प्रकरणात पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील जामसाळायेथे काल शनिवारी रात्री पत्नी वैशाली व पती दुर्वास ह्या नवरा-बायकोमध्ये जोरदार वाद झाला होता. पती दुर्वास हा नेहमी दारूच्या नशेत राहत असून, त्यामुळे घरात नेहमी भांडणाचे प्रसंग घडत असत. याच वादाचे पर्यवसान आज पहाटे खुनात झाले. पहाटे पाच वाजताच्या सुमारास भांडणाचा वचपा काढण्यासाठी संतप्त झालेल्या पत्नीने रागाच्या भरात झोपेत असलेल्या पतीचा रुमालाने गळा दाबला. दुर्वासला काहीतरी अनर्थ होतोय याची जाणीव होताच त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा प्रयत्न व्यर्थ ठरला. आणि पतीचा जीव गेला. मृतकाची आई सुनंदा बाबुराव चौधरी (वय ७०) यांनी पोलिसात या घटनेची तक्रार दाखल केली. असून आरोपी विरोधात पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे अप. क्र. २१०/२०२५ अंतर्गत कलम १०३ (१), ११५ (२), ३५२ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत राजुरा येथे रमाबाई वॉर्डातील महिला कविता लक्ष्मण रायपुरे (वय 53) हि भाऊ सुरेश लक्ष्मण रायपुरे (वय 32) याचेसह राहत होती. तसेच ती घराला लागून असलेले स्वतःचे किराणा दुकान चालवित होती. भाऊ सुरेश हा श्रीराम सिटी फायनान्स शाखा राजुरा येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो. त्याच वॉर्डात राहणारी मुलगी ममता उत्तम अलोने ही आज रविवारी आईच्या दुकानातील फ्रीज मध्ये ठेवलेले दूध आणण्यासाठी सकाळी गेली असता दुकान बंद होते. तसेच कंपाऊंडच्या गेटला ताला लावलेला होता. आईला आवाज दिला परंतु तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मुलीने घरी जाऊन स्वतःकडे असलेली चाबी घेऊन आली. आईच्या घराच्या गेटचा ताला उघडला आणि आवाज दिला. त्यानंतरही आईने प्रतिसाद दिला नाही. कुलरच्या खिडकीमधुन आत पाहीले तेव्हा ती बेडवर झोपलेली दिसली. वारंवार आवाज देवुन सुध्दा आई उठत नसल्याने ती घाबरली. घरी जावुन पतीला बोलावून आणले. पतीने जाऊन बघितले असता मृत्यू झाल्याचा संशय आला. पोलीसांना घटनेची माहिती होताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी महिलेचे निरीक्षण केले असता त्या महिलेच्या कपाळावर धारदार वस्तुने मारल्यामुळे रक्तबंबाळ झाली होती. घरामध्ये एकटीच झोपुन असतांना अज्ञात इसमाने आईच्या कपाळाचे वरच्या भागास डोक्यावर कोणत्यातरी धारदार वस्तुने मारुन तिचा खुन केल्याचे समोर आले. पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.