चंद्रपूर : जिल्ह्यात घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासाला अधिक वेग आणि वैज्ञानिक आधार देण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात पाच अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन तज्ञांच्या पथकासह दाखल झाल्या आहेत. या व्हॅनच्या मदतीने घटनास्थळीच भौतिक आणि शास्त्रीय पुरावे संकलित करता येणार असल्याने गुन्हे तपासाची प्रक्रिया अधिक प्रभावी व अचूक होणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासात परिस्थितीजन्य आणि शास्त्रीय पुराव्यांचे मोठे महत्त्व असते. यासाठी प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब) कार्यरत असून, गुन्हे तपासाला वैज्ञानिक दिशा देण्याचे काम ती करत आहे. विशेषतः खून, लैंगिक अत्याचार, स्फोटक पदार्थांचा वापर किंवा अन्य गंभीर गुन्ह्यांच्या तपासात घटनास्थळावरील सूक्ष्म पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरतात.
यापूर्वी जिल्ह्यात दोन मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यरत होत्या. आता त्यात भर म्हणून प्रत्येक उपविभागासाठी एक अशा एकूण पाच नवीन अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन जिल्हा पोलीस दलात दाखल झाल्या आहेत. या व्हॅनमध्ये प्रशिक्षित फॉरेन्सिक तज्ञांची टीम नियुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे घटनास्थळी तात्काळ वैज्ञानिक तपासणी करणे शक्य होणार आहे.
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची प्रमुख वैशिष्ट्ये :
या अत्याधुनिक व्हॅनमध्ये घटनास्थळीच विविध प्रकारचे भौतिक पुरावे संकलित करण्याची व्यवस्था आहे. रक्ताचे नमुने, केस, कपडे किंवा इतर वस्तूंचे नमुने थेट घटनास्थळी संकलित करता येतात. गुन्हेगारांची ओळख पटविण्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या बोटांच्या ठशांची तपासणीही त्वरित करता येते.
याशिवाय स्फोटक पदार्थांची तपासणी करण्यासाठी आवश्यक किट्स, रक्त व डीएनए नमुने संकलनासाठी विशेष साधने तसेच लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये आवश्यक असणारे पुरावे गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था या व्हॅनमध्ये उपलब्ध आहे. संकलित केलेले नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जातात.
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि त्यात कार्यरत असलेल्या तज्ञांच्या मदतीने पोलीस तपास पथक घटनास्थळाची अत्यंत बारकाईने पाहणी करू शकते. घटनास्थळी आढळून येणारे सूक्ष्म आणि बारीक पुरावे गोळा करून त्यांचे रासायनिक व जैविक विश्लेषण केले जाते. या प्रक्रियेतून पुराव्यांची साखळी अधिक मजबूत होते आणि आरोपीविरुद्ध न्यायालयात सबळ पुरावे सादर करता येतात.
या आधुनिक सुविधेमुळे गुन्हे उकलण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होणार असून न्यायालयीन प्रक्रियेत दोषींना शिक्षा होण्याची शक्यता देखील अधिक बळकट होणार आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन तसेच अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन चंद्रपूर जिल्ह्यातील विविध उपविभागांमध्ये कार्यरत राहणार आहेत. त्यामध्ये चंद्रपूर, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी, मुल, राजुरा आणि गडचांदूर या उपविभागांचा समावेश आहे.